गेल्या एक वर्षापासून भारत कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. सध्या एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, तर दुसरीकडे लसीकरणाला गती आलेली आहे. अशात सरकार या विषाणूबाबत व त्याच्या संरक्षणात्मक उपायांबाबत वरचेवर जागरुकही करत आहे. मात्र या सर्वांमध्ये अजूनही असे काही लोक आहेत जे अंधश्रध्येच्या आहारी जाऊन समाजामध्ये चुकीची माहिती पसरवत आहेत. कर्नाटकचे भाजपा आमदार (BJP MLA) अभय पाटील (Abhay Patil) यांनी मंगळवारी होम-हवन (Agnihotra Homa) केले. त्यानंतर त्यांनी मिरवणूकही काढली. या धुरामुळे कोरोना पळून जाईल असे त्यांना वाटत होते. बेळगावी (Belagavi) शहरात काढलेल्या मिरवणुकीचे पाटील स्वतः नेतृत्व करीत होते. विशेष बाब म्हणजे कर्नाटकमध्ये सध्या लॉकडाउन आहे, त्याची पर्वाही पाटील यांनी केली नाही.
कर्नाटकातील बेलगावीमध्ये स्थानिक आमदाराने कोरोनापासून बचाव करण्यासाठी हवन केले, त्यानंतर ते ट्रॉलीमध्ये ठेवले आणि शहरभर फिरविले. एवढेच नव्हे तर, जेथे ते पोहोचू शकले नाहीत, तेथे स्वतंत्र हवनची व्यवस्था केली गेली, जेणेकरून बेळगाव कोरोनामुक्त होईल. या भागात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. बेलगावीच्या रस्त्यावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पाटील यांच्यासमवेत इतरही लोक सहभागी झाले होते. हे लोक हातगाडीवर असलेल्या हवनमध्ये गोवऱ्या, कडुलिंबाची पाने, धूप टाकत होते. मंगळवारी सकाळी, ही हातगाडी जुन्या शहरातील रस्त्यावर फिरताना दिसली.
#Karnataka MLA and BJP leader Abhay Patil led an 'Agnihotra' procession in Belagavi on Tuesday, according to him the smoke emitted from the ‘homa’ fire would clear the air and eradicate #COVID19. @IndianExpress pic.twitter.com/lKrEUoAFO8
— Darshan Devaiah B P (@DarshanDevaiahB) May 25, 2021
दक्षिण बेलगावी सीटचे तीन वेळा आमदार असलेले पाटील म्हणाले की, त्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे. त्यांना असे वाटते की, होम-हवनमुळे शहरातील भयानक कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल. ते म्हणाले की, लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ते या सर्व गोष्टी करत आहेत. (हेही वाचा: शरीराच्या विविध भागात वाढणार्या बुरशीचा रंग वेगवेगळा असू शकतो; फंगल इंफेक्शन Communicable Disease नाही - Dr. Randeep Guleria)
पाटील यांच्या मतदारसंघातील जवळजवळ 50 घरांच्यासमोर असा हवन केला गेला. यावेळी लॉकडाउन प्रोटोकॉल तोडला गेला ही गोष्ट पाटील यांनी स्पष्टपणे नाकारली. ते म्हणाले की ही प्रक्रिया विधानसभा क्षेत्रात 15 जूनपर्यंत सुरू राहील. भाजप नेते पुढे म्हणाले की होम ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हवन हे हिंदूंसाठी एक शास्त्र आहे. दरम्यान, भाजप नेते देशातील इतरही अनेक ठिकाणी असाच आंधळा विश्वास पसरवत आहेत. यासाठी सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहे.