Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

'अती राग आणि भीक माग' ही म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. याचीच प्रचिती कर्नाटक (Karnataka) राज्यातील हावेरी जिल्ह्यातील (Haveri District) एका व्यक्तीस आली. या पठ्याने चक्क एका बँकेचे कार्यालयच जाळले. कारण काय तर म्हणे बँकेने त्याला कर्ज नाकारले. आता या पठ्ठ्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि तो तुरुंगाची हवा खातो आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने एका बँकेकडे कर्जासाठी अर्ज (Loan Application) केला होता. जो बँकेने फेटाळला. या रागातून त्याने चक्क बँक कार्यालयच जाळण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला.

कागिनेली पोलिसांनी (Kaginelli Police Station) आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या (Indian Penal Code) कलम 436, 477 आणि 435 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला कर्जाची आवश्यकता होती. त्याने बँकेशी संपर्क केला. दरम्यान, बँकेने त्याचा कर्जाचा अर्ज फेटाळला. पोलिसांनी सांगितले की, सर्व कागदपत्रे तपासल्यावर बँकेने आरोपीला कर्ज न देण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा, Documents For Home Loan: गृह कर्ज घेताय? तर 'हे' कागदपत्रं ठेवा तयार; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट)

बँकेकडे कोणत्याही कर्जासाठी अर्ज आल्यास बँक सर्व कागदपत्रांची तपासणी करते. त्यानंतर कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे वर्तन, त्याची पत पाहून कर्ज वितरीत करते. सर्व कायदेशीर आणि कागदपत्रांची पूर्तता असली तरीही एखाद्या व्यक्तीस कर्ज मिळेलच याची खात्री देता येत नाही. कारण कर्ज देण्याचा अधिकार बँक स्वत:कडे राखून ठेवते. दरम्यान, पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.