Ban on Mamata Banerjee's Campaigning: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर 24 तास बंदी
Mamata Banerjee (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) निवडणुकीच्या वातावरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठी कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर निवडणूक आयोगाने 24 तास बंदी घातली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार ममता बॅनर्जी 12 एप्रिल रोजी रात्री 8 ते 13 एप्रिल रात्री 8 वाजेपर्यंत कोणत्याही मार्गाने प्रचार करू शकणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या हिंदू-मुस्लिम विधानावर ही कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर बंदी आणल्यानंतर, टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना  त्यांच्या एका सभेत मुस्लिमांना संबोधित करताना दिलेल्या निवेदनावर नोटीस पाठविली आहे. यापूर्वीही ममता यांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादिवशी, ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारमधील हिंसाचाराबद्दल सीएपीएफबाबत एक विधान केले होते. ममता बॅनर्जी यांनी 8 एप्रिल रोजी हुगळी जिल्ह्यातील बालागड येथे जाहीर सभांना संबोधित करताना आरोप केला होता की, केंद्रीय सेना अमित शहाद्वारे चालणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालया'च्या निर्देशानुसार काम करत आहे.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. सीएम ममता यांनी रविवारी ट्विट केले की, निवडणूक आयोगाने MCC चे नाव बदलून मोदी कोड ऑफ कंडक्ट ठेवले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशी विधाने ममता बॅनर्जी यांनी करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने त्यांना दिले आहेत. याबरोबरच ममता बॅनर्जी यांना संयम साधण्याचा सल्लाही आयोगाने दिला आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्या दुपारी 12 वाजल्यापासून गांधी मूर्ती, कोलकाता येथे धरणा आंदोलन करणार आहेत.