Antibody Cocktail: कोविड-19 रुग्णांसाठी देशातील काही हॉस्पिटल्समध्ये 'अँटीबॉडी कॉकटेल' चा वापर सुरु; एका डोससाठी मोजावे लागतील तब्बल 'इतके' रुपये
Casirivimab and Imdevimab (Photo Credits: ANI)

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) धुमाकूळ घालत असताना त्यावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नवनवीन उपचारपद्धती, औषधांचा वापर कोरोनामुक्त होण्यासाठी केला जात आहे. त्यात आता 'Antibody Cocktail' ची भर पडली आहे. दिल्लीमधील काही खाजगी रुग्णालयात ही अॅंटीबॉडी उपचारपद्धती वापरली जात आहे. ही थेरपी सौम्य, मध्यम आणि हाय रिक्स कोविड रुग्णांमध्ये वापरली जात आहे. (AYUSH 64 या कोविड 19 वरील औषध वितरणास गोव्यात सुरूवात)

या उपचारपद्धतीमध्ये Casirivimab आणि Imdevimab चे कॉम्बिनेशन केले जाते. त्यामुळे यास अॅंटीबॉडी कॉकटेल असं म्हणतात. अमेरिकेत वापरली जाणारी ही उपचारपद्धती आता भारतात देखील उपलब्ध झाली आहे. मात्र याचा खर्च थोडा जास्त आहे. अँटीबॉडी कॉकटेलच्या एका डोसची किंमत तब्बल 59,750 इतकी आहे.

दिल्ली मधील लोकनायक सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, ही उपचारपद्धती महागडी असल्याने आम्ही याबद्दल विचार करत नाही. हे श्रीमंत लोकांसाठी आहे. तसंच सध्या त्याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर केला जात आहे.

दरम्यान, गुरुवारपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये या उपचारपद्धतीचा वापर केला जात आहे. यामुळे SARS-CoV2 व्हायरसचे बायडिंग रोखले जाते. हे औषध सुरुवातीला देणे आवश्यक आहे. रुग्ण पॉझिटीव्ह होण्याच्या  48-72 तासांनंतर देणे, आदर्श मानले जाते. परंतु, आठवड्याभरातही हे औषध दिले तरी चालू शकते. मृत्यूचा धोका आणि लक्षणांचा कालावधी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच हे औषध नेमके कोणाला द्यायचे याचे निकष ठरलेले आहेत, असे अपोलो हॉस्पिटलचे ग्रुप मेडिकल डिरेक्टर डॉ. अनुपम सिब्बल यांनी सांगितले.

कोविड-19 चा गंभीर धोका असलेल्या, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक, 55 वर्षांवरील हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती. किडनी विकार, मधुमेह यांसारखे आजार असलेल्या व्यक्तींवर ही उपचारपद्धती वापरता येईल, असे हॉस्पिटलचे म्हणणे आहे.