फाटलेल्या जीन्सनंतर उत्तराखंड सीएम Tirath Singh Rawat यांचे अजून एक वादग्रस्त विधान- 'जास्त रेशन हवे होते तर दोन मुलांऐवजी 20 मुलांना जन्म द्यायचा होता' (Watch Video)
Tirath Singh Rawat (Photo Credits- Twitter)

फाटलेल्या जीन्सबाबत विधान करून अनेक दिवस चर्चेत असलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत (Uttarakhand CM Tirath Singh Rawat) यांनी पुन्हा एकदा असे विधान केले आहे, ज्यावरून वाद निर्माण होऊ शकतो. रामनगरमध्ये आंतरराष्ट्रीय वनीकरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीएम रावत यांनी लॉकडाऊनच्या वेळी सरकारने वितरीत केलेल्या धान्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, सरकारने वितरीत केलेल्या धान्याबाबतही काही लोकांच्या मनात असूया निर्माण झाली. दोन सदस्यांना 10 किलो धान्य देण्यात आले, तर 20 सदस्यांना एक क्विंटल धान्य का दिले गेले?

याचे उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, ‘यामध्ये दोष कोणाचा आहे?  त्याला वीस मुले आहेत म्हणून त्याला एक क्विंटल मिळाले, तुला दोन मुले आहेत म्हणून तुला 10 किलो मिळाले, त्यात हेवा वाटण्यासारखे काय आहे?’

तीरथसिंग रावत म्हणाले की, ‘कोरोना कालावधीत प्रत्येक युनिटला 5 किलो रेशन सरकारकडून देण्यात आले. ज्यांची 10 मुले होती त्यांना 50 किलो मिळाले, ज्यांची 20 होती त्यांना क्विंटल रेशन देण्यात आले. तरीही 2 मुले असलेल्या लोकांना वाटले की आम्हाला 10 किलोच का देण्यात आले? त्याने 20 मुले जन्माला घातली म्हणून त्याला क्विंटल मिळाले, जेव्हा वेळ होती तेव्हा तू दोनच मुले जन्माला घातली म्हणून तुला 10 किलो मिळाले.’ (हेही वाचा: Rahul Gandhi on Modi Government: मोदी सरकारने काय वाढवलं? बेरोजगारी, महागाई आणि मित्रांची कमाई; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा)

याच कार्यक्रमात सीएम तीरथसिंग रावत म्हणाले की, ‘कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी भारत इतर देशांपेक्षा चांगले काम करत आहे. त्याच वेळी, ज्याने आम्हाला 200 वर्षे गुलाम बनवून ठेवून जगावर राज्य केले, असा देश अमेरिका सध्याच्या काळात संघर्ष करीत आहे.’ इंग्लंड ऐवजी अमेरिका म्हटल्याने आता ते ट्रोल होत आहेत. अशाप्रकारे तीरथ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आठवडाभरातच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचे फाटलेल्या जीन्सबाबतच्या विधानामुळे मोठा गदारोळ माजला होता.