
देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पहिल्या आणि दुसर्या लाटेदरम्यान बर्याच घटना, किस्से समोर आले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. माहितीनुसार, मागील 15 महिने म्हणजेच 1.5 वर्षांपासून एक कुटूंब घराबाहेर पडले नाही. या कुटुंबाला कोरोना विषाणूची इतकी भीती होती की, घरातून बाहेर पडणे तर सोडाच मात्र या घरातील महिला 15 महिने एका अंधाऱ्या बंद खोलीत होत्या. आता ही बाब उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांना धक्का बसला आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) हैदराबादमधील गोदावरी कदली परिसराची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे शेजारील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या कुटुंबाने स्वतःला कोंडून घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जेव्हा लोक घराबाहेर पडू लागले तेव्हाही हे कुटुंब आपल्या घरातच बंदिस्त होते. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घरी भेटण्याचा प्रयत्न केला असता कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 15 महिन्यांनंतर, जेव्हा लोकांनी या कुटुंबाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. गावकऱ्यांनी सांगितले की, दीड वर्षांपासून कुटुंबातील कोणत्याही महिलेला त्यांनी पाहिले नाही.
असे सांगितले जात आहे की जेव्हा कोणी आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचत असे तेव्हाही कुटुंबाकडून कोणतेही उत्तर मिळत नसे. जेव्हा सरकारी योजनेंतर्गत निवासी भूखंड वाटपासाठी गावातील एक स्वयंसेवक त्यांच्या घरी गेला तेव्हा ही बाब उघडकीस आली. या स्वयंसेवकाने गावातील सरपंच व इतर लोकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावचे सरपंच व बाकीचे पोलिसांकडे गेले. त्यानंतर पोलिसांनी येऊन सर्वांना घराबाहेर काढले व त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जेव्हा या सर्वांना घराबाहेर काढले तेव्हा त्यांची स्थिती अतिशय खराब होती. अनेक दिवस त्यांनी अंघोळ केली नव्हती. आता त्यांना समजावून सांगितले आहे की, कोरोनाची लस आल्याने घाबरण्याचे कारण नाही. यासह डॉक्टर त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचाही प्रयत्न करीत आहेत.