Amul Topical: अमूलने डूडल साकारत केले मोदींच्या दिवे लावण्याच्या संकल्पनेचे समर्थन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अशी प्रतिक्रीया
Amul topical on PM Modi's light-up call | (Photo Credits: Twitter/@Amul_Coop)

कोरोना व्हायरसच्या आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात कोरोना व्हायरसचा निराशामय अंधःकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च पेटवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आवाहनाच्या समर्थनार्थ अमूलने खास डूडल साकारले आहे. या डूडलमध्ये 'अमूल गर्ल' घरातील लाईट्स बंद करुन दिवा/मेणबत्ती लावताना दाखवण्यात आली आहे. 'बत्ती ऑफ, बटर ऑन' असे कॅप्शन त्यावर दिसत आहे. 'Do Light Things' असेही डुडलवर लिहिण्यात आले आहे. अमूलने हे डुडल आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. हे डूडल साकारुन पंतप्रधान मोदींच्या दिवे लावण्याची संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. (5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा, कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन)

कंपनीने हे डुडल ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "पंतप्रधानांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा लावण्यास सांगितले आहे." यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट करत लिहिले की, "5 एप्रिल रोजी रात्रीची ही 9 मिनिटे देशाला अधिक जवळ आणतील आणि कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळकटी येईल."

Amul Topical वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया:

शुक्रवारी (3 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या संकटात देशातील सर्व नागरिक एकत्र आहेत. ही एकजूट दाखवण्यासाठी आणि निराशामय अंधारातून मनोबल वाढवणाऱ्या प्रकाशाकडे नेण्यासाठी घराच्या गॅलेरीतून किंवा दारातून दिवा प्रज्ज्वलित करण्याचे आवाहन केले आहे.