Amravati Violence: अमरावतीमध्ये कलम 144 लागू, हिंसाचाराबाबत खासदार Navneet Rana यांचे शांततेचे आवाहन- 'संजय राऊत आणि पालकमंत्र्यांनी घटनेचे राजकारण करू नये' (Watch Video)
Navneet Kaur Rana (Photo Credit: ANI)

त्रिपुरा हिंसाचाराची (Tripura Violence) आग महाराष्ट्रातही पसरली आहे. त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये (Amravat) दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. शुक्रवारी अमरावतीमध्ये त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली, त्यादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी शनिवारी बंद पुकारला आहे. शहरात गर्दी वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. शहरातील परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीमार करावा लागला. अमरावतीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

यावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet R Rana) यांनी अमरावतीकरांना आणि राज्यातील बड्या नेत्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्या म्हणतात, ‘काल अमरावतीमध्ये मोर्चे निघाले मात्र आत अमरावतीमध्ये जोरदार निषेध चालू आहे. हिंसाचार उफाळला आहे. त्याची आम्ही निंदा करतो. मात्र या ठिकाणी पालकमंत्री आणि संजय राऊत यांनी घटनेचे राजकारण करू नये अशी मी विनंती करते. अमरावती आमची आहे व तिला सुरक्षित ठेवण्याचे काम आमचे आहे. घडत असलेली घटना अजून भडकावण्यापेक्षा, अमरावतीमध्ये शांतता राहावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’

शेवटी त्या म्हणतात ‘निषेध करा, तो केला पाहिजे परंतु हे शांततेमध्ये घडले पाहिजे.’ काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांदरम्यान मशिदींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. यानंतर त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावतीसह अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली.

शुक्रवारी अमरावतीमध्ये अनेक मुस्लीम संघटनांनी त्रिपुरा मुद्द्यावरून उग्र रूप धारण केले. याविरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी अमरावती बंदचे आवाहन केले. राजकमल चौकात सर्व हिंदू संघटना आणि भाजप कार्यकर्ते एकत्र आले. यानंतर जमावाने तोडफोड सुरू केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. (हेही वाचा: Amravati Violence: अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड)

याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात आज राज्यभरातील मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढला होता. यादरम्यान नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मी सर्व हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो. सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी मी अमरावतीचे खासदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवता येईल आणि शांतता कशी राखता येईल यावर आमचा भर आहे.’