Air Pollution: वायू प्रदूषणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर; 2019 मध्ये तब्बल 1.16 लाख नवजात बाळांचा झाला मृत्यू
File image of air pollution in Delhi | (Photo Credits: PTI)

वायू प्रदूषण (Air Pollution) हे प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी धोकादायक आहे, परंतु नवजात मुलांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. अमेरिकेच्या एका संस्थेने भारतातील नवजात मुलांच्या जीवनावर वायू प्रदूषणाचा किती घातक परिणाम होत आहे यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यूएस हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूटने जारी केलेल्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर-2020 (State of Global Air Report 2020) च्या अहवालात, भारतातील वायू प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या नवजात मुलांचा मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की सन 2019 मध्ये वायू प्रदूषणामुळे 1.16 लाखाहून अधिक नवजात मुलांचा मृत्यू झाला आहे.

या सर्व मृत्यूमुखी पडलेल्या मुलांना जन्मानंतर अवघ्या एका महिन्याच्या आतच आपला जीव गमवावा लागला आहे. भारताव्यतिरिक्त नायजेरिया (67900 मृत्यू), पाकिस्तानमध्ये (56,700 मृत्यू), इटिपोया (22,900 मृत्यू) अशा देशांची नावेही या अहवालात समाविष्ट आहेत. अहवालात असे म्हटले आहे की मृत्यूची बायोलॉजिकल कारणे स्पष्टपणे सांगता येत नाहीत, परंतु हे निश्चितच आहे की प्रदूषणाचा विपरीत परिणाम गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवर झाला आहे. याव्यतिरिक्त, अशा वातावरणाचा परिणाम वेळे आधी जन्मलेली मुले आणि कमी वजन असलेल्या मुलांवरही परिणाम होतो. यासह, गर्भाच्या विकासादरम्यान वायू प्रदूषणाचा नकारात्मक परिणाम त्याच्या आरोग्यावरही होतो. (हेही वाचा: प्लाझ्मा थेरेपी बंद करण्याचा विचार सुरू, कोरोना विषाणू उपचारांमध्ये ठरली नाही प्रभावी- ICMR)

स्टेट ऑफ ग्लोबल एयर रिपोर्ट-2020 मध्ये जगभरातील प्रदूषणाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. अहवालानुसार, 2019 मध्ये वायुप्रदूषणामुळे हृदयविकार झटका, फुफ्फुसांचा कर्करोग, फुफ्फुसांचे इतर आजार उद्भवले व ज्यामुळे जवळपास 67 लाख लोकांचा बळी गेला आहे. यापैकी भारतात सुमारे 16.7 लाख लोकांनी वायू प्रदूषणामुळे होणा-या आजारांमुळे आपले प्राण गमावले आहेत. एअर क्वालिटीचे संचालक कल्पना बालकृष्ण म्हणतात, जर देशात डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार हवेची गुणवत्ता राखली गेली असती तर आपण सुमारे 1.16 लाख मुलांचे प्राण वाचवू शकलो असतो.