राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अयोध्या येथे राम मंदिर (Ram Mandir) उभारण्याबाबत लक्षवेधी वक्तव्य केले आहे. भागवत यांनी राम मंदिर उभारण्याबात थेट तारीख सांगितली नाही. मात्र, देशात कोणात्याही पक्षाचे सरकार असले तरी, लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिर उभारण्यास आरएसएस सुरुवात करेन, असे त्यांनी म्हटले आहे. डेहराडून येथे संघाच्या एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. भागवत यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान बोलताना भागवत यांनी राम मंदिर, धर्म, जातीयता, धार्मिक भेदभाव, जातीवर आधारीत आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांवर भाष्य केले. या वेळी बोलताना कुंभ मेळ्यात पार पडलेल्या धर्म संसदेनुसार मंदिर उभारणी करण्यात येईल, असेही भागवत यांनी सांगितले. विशेष असे की, विश्व हिंदू परिषदेने (VHP) राम मंदिर आंदोलन स्थगित केल्याची घोषणा नुकतीच केली होती. त्यानंतर भागवत यांचे वक्तव्य आल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. संघनेत्याने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, गोळवलकर गुरुजींचे कालबाह्य विचार संघाने सोडले: मोहन भागवत)
दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा पुन्हा एकदा आक्रमकपणे समोर येण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे देशाचे राजकारण राम मंदिराच्या मुद्द्याभोवती फिरत राहिले आहे. राम मंदिर उभारणीचे निवडणुकीपूर्वी अश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपकडून आपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, बहुमताचे सरकार येऊनही भाजपला राम मंदिर उभारण्यात अद्यापतरी यश आले नाही. त्यामुळे आगामी काळात राम मंदिराचा मुद्दा कसा आकार घेतो याबाबत उत्सुकता आहे.