हिंडनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यासोबतच विरोधी पक्षाकडून देखील अदानी समुहाची (Adani Group) चौकशी करण्याची मागणी वारंवार होत आहे. यादरम्यान अदानी समुहाने काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून (Mumbai) गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी (ACC) आणि अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) या कंपन्यांचा देखील समावेश आहे. या विभागातील कामकाज देखील अहमदाबादमधून सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे.
अदानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 6.5 अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात चकरा माराव्या लागत होत्या. यामुळे हे कार्यलय आता अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिल्ली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कंपनीत मिळून एकूण 10,000 कर्मचारीअसून अनेकांनी कंपनीच्या या निर्णयामुळे दुसरी संधी शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.