Republic Day 2022: यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणार भव्य Fly Past; जग्वार, राफेल, सुखोई फायटर जेटसह 75 विमानांचा सहभाग
Rafale (Photo Credit- Wikimedia Commons)

Republic Day 2022: यावर्षी प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) परेड सर्वात मोठी आणि भव्य फ्लायपास्ट (Fly Past) असणार आहे. ज्यामध्ये हवाई दल, नौदल आणि लष्कराची एकूण 75 विमाने भाग घेणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आयोजित या प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये, एकूण 17 जग्वार लढाऊ विमाने (Jaguar Fighter Jet) राजपथाच्या अगदी वर '75' बनवताना दिसणार आहेत. यंदा नौदलाचे पी8आई टोही विमान आणि MiG29K लढाऊ विमानांसह हवाई दलाचे जग्वार, राफेल आणि सुखोई लढाऊ विमानेही प्रथमचं सहभागी होणार आहेत. फ्लायपास्टमध्ये लष्कराच्या एव्हिएशन विंगचे हेलिकॉप्टरही सहभागी होणार आहेत. 1971 च्या युद्धाच्या सुवर्ण विजय वर्षाच्या स्मरणार्थ, यावर्षी फ्लायपास्टमध्ये दोन विशेष फॉर्मेशन पाकिस्तानवरील विजयासाठी समर्पित असणार आहेत.

दरम्यान, वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर इंद्रनील नंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी राजपथावर एकूण 16 फॉर्मेशन्स दिसणार आहेत. हा फ्लायपास्ट दोन भागात असेल. प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होण्याच्या 10 सेकंद आधी 'ब्लॉक वन' सुरू होईल. या ब्लॉकमध्ये हेलिकॉप्टरच्या दोन फॉर्मेशन असतील. सर्वात प्रथम चार Me17V5 हेलिकॉप्टरचा ध्वज तयार केला जाईल. यातील 17v5 वर तिरंगा असेल आणि इतर तिन्ही हेलिकॉप्टरवर सैन्याच्या तिन्ही शाखांचे झेंडे फडकावले जातील. हेलिकॉप्टरचे दुसरे फोर्मेशन चार ALH हेलिकॉप्टरचे असेल, जे डायमंड फॉर्मेशन तयार करेल आणि राजपथावरील सैन्याच्या वाहनांसह आकाशात दिसेल. (वाचा - Amazon Great Republic Day Sale: ॲमेझॉन सेल आजपासून सुरू; मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर मिळवा मोठी सूट, जाणून घ्या खास ऑफर्स)

हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लायपास्टची सर्व रचना राजपथजवळील जलवाहिनीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर केली जाईल. हेलिकॉप्टर राजपथपासून सुमारे 200 फूट उंचीवर उड्डाण करतील, तर लढाऊ विमाने सुमारे 1000 फूट उंचीवर उड्डाण करतील. वायुसेनेनुसार, ब्लॉक दोन राजपथवरील परेड संपल्यानंतर सुरू होईल. यामध्ये पहिले तीन फॉर्मेशन हेलिकॉप्टरचे असतील. पहिले पाच ALH हेलिकॉप्टरचे 'राहत' फॉर्मेशन आणि दुसरे 'मेघना' फॉर्मेशन असेल. मेघना फॉर्मेशन 71 च्या युद्धाला समर्पित आहे. तिसरी रचना अटॅक हेलिकॉप्टरची आहे, ज्यामध्ये एक रशियन Mi35 हेलिकॉप्टर आणि चार अमेरिकन अपाचे असतील. फ्लायपास्टची पुढील फोर्मेशन देखील 1971 च्या युद्धाला समर्पित आहे ज्यामध्ये एक विंटेज, डकोटा विमान आणि दोन डॉर्नियर विमान असतील. यामुळे 'टँगल' तयार होईल.

दरम्यान, एरो फॉर्मेशनमध्ये 'नेत्रा' फॉर्मेशनमध्ये एक AWACS टोही विमान आणि प्रत्येकी दोन सुखोई आणि मिग 29 लढाऊ विमाने असतील. या वर्षी एकूण सात राफेल लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. पाच राफेल 'विनाश' फॉर्मेशनमध्ये असतील. याशिवाय 'बाज' फॉर्मेशनमध्ये एक राफेल, दोन जग्वार्स, दोन मिग-29 आणि दोन सुखोई दिसणार आहेत. IAF नुसार, तीन सुखोई लढाऊ विमाने 'त्रिशूल' फॉर्मेशनमध्ये असतील.