Shaheen Bagh Protest: शाहीन बाग प्रदर्शनात सामील होणाऱ्या 4 महिन्यांच्या बाळाचा थंडीमुळे मृत्यू
मोहम्मद जहांचे पालक नाझिया व आरिफ (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीतील शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात निषेध चालू आहे. अशात या निषेधादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे, ज्यात एका 4 महिन्याच्या निरागस मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांचा मोहम्मद जहां (Mohammed Jahaan) याला त्याची आई दररोज शाहीन बागच्या निदर्शनात सामील होण्यासाठी घेऊन जात होती. तेथे आंदोलक त्याला त्यांच्या मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालत असत. बऱ्याचदा त्याच्या गालावर तिरंगा रंगवत असत. मात्र गेल्या आठवड्यात थंडीमुळे मोहम्मदचे निधन झाले.

शाहीन बागेत उघड्यावर होत असलेल्या प्रदर्शनामुळे या चार महिन्यांच्या मुलास थंडी वाजून आले. त्यामुळे त्याची छाती भरली तसेच सर्दी वाढत गेली. मात्र त्याची आई अजूनही निदर्शनात सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम होती. ती म्हणत असे, 'हे माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे'. मात्र आता या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही या पालकांनी प्रदर्शनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: दिल्ली: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पुन्हा गोळीबार)

मोहम्मद जहांचे पालक नाझिया व आरिफ बाटला हाऊस परिसरातील प्लास्टिक व जुन्या कपड्यांनी बनविलेल्या छोट्या झोपडपट्टीत राहत आहेत. त्यांना आणखी दोन मुले आहेत- एक पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील या जोडप्याला त्यांचा रोजचा खर्च भागविणे मुश्कील आहे. आरिफ भरतकामाचे काम करतो आणि ई-रिक्षा चालवतो. नाझिया त्याला त्याच्या कामात मदत करते. 30 जानेवारी रोजी मोहम्मदचा मृत्यू झाला.

नाझिया 18 डिसेंबरपासून दररोज शाहीन बागच्या प्रदर्शनात सहभागी होत आहे. मात्र यामुळेच तिच्या बाळाला सर्दी झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.