Jamia Millia Islamia University firing incident (PC - ANI)

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या (Jamia Millia Islamia University) परिसरामध्ये पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट नंबर -5 जवळ रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. दोन दिवसांपूर्वीच जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला होता.

या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रविवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने आणि निदर्शने सुरू आहेत. याअगोदरही जामिया विद्यापीठात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. (हेही वाचा - जळगाव: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ट्रक आणि क्रूजरचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू)

या प्रकरणानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसीच्या कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे एसीपी जगदीश यादव यांनी सांगितले आहे. शनिवारी शाहीन बागेत एका अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.