Wildfire in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) लुंगला उपविभागातील तवांग चू नदीजवळ शुक्रवारी मोठा वणवा (Wildfire) पेटला. ज्यामुळे गावांना धोका निर्माण झाला, परंतु स्थानिक अधिकारी आणि लष्कराच्या जवानांनी जलद प्रतिसाद दिल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, निवासी क्षेत्रांजवळील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी, उंचवट्यामुळे दाट जंगलात आग सुरूच आहे.
तवांगमध्ये मोठा वणवा
तवांग चु (तवांग नदी) ही तवांग जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. तिबेटमधून येणाऱ्या दोन नद्या तवांग जिल्ह्यात या नदीला मिळतात आणि तिथून ही नदी भूतान आणि आसाममध्ये वाहते. अधिकाऱ्याने सांगितले की, सशस्त्र सीमा बल (एसएसबी), तवांग ब्रिगेडचे भारतीय लष्कराचे जवान, राज्य पोलिस आणि स्थानिक रहिवाशांसह लुंगला प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केल्याने सगक्युर गावाजवळील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ज्यामुळे संभाव्य जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळता आले.