मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्यानंतर इंफाळ शहर पुन्हा आगीसारखे पेटू लागले आहे. इंफाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर प्रशासनाने इंफाळमधील सरकारी शाळा आणि महाविद्यालये 19 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सचिवालयाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे की, “अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लावलेला कर्फ्यू आणि विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी रविवारी रात्री हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयात जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, लहान मुलांसह सहा मृतदेह सापडल्यानंतर शनिवारपासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाल्यानंतर रविवारी रात्री लष्करासह संयुक्त सुरक्षा दलांनी इम्फाळमध्ये फ्लॅग मार्च काढला होता.
कुकी-जो जमातीची प्रमुख संघटना असलेल्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने रविवारी रात्री सांगितले की, शनिवारी रात्री जिरीबाममधील प्रतिस्पर्धी समुदायातील हल्लेखोरांनी किमान पाच चर्च, एक शाळा, एक पेट्रोल पंप आणि आदिवासींची 14 घरे जाळली.
इंफाळ पश्चिमसह 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद मुख्य सचिव विनीत जोशी यांनी शनिवारी संध्याकाळपासून इम्फाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, ककचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर या सात जिल्ह्यांमध्ये दोन दिवस मोबाइल इंटरनेट आणि डेटा सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले.