Mamata Banerjee Attacks PM After Meeting: पंतप्रधान मोदी यांच्या मीटिंगनंतर ममता बॅनर्जी भडकल्या; म्हणाल्या, आम्हाला बोलण्याची परवानगी दिली नाही
Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

Mamata Banerjee Attacks PM After Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत दहा राज्यांचे डीएम सहभागी झाले होते, परंतु पश्चिम बंगालचे कोणतेही डीएम सहभागी झाले नाहीत. या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पत्रकार परिषद घेतली. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बैठकीत दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, यावेळी केवळ काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपलं म्हणणं मांडलं. आम्हाला बोलू दिलं नाही, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. सर्व मुख्यमंत्री फक्त शांत बसले, कोणी काही बोलले नाही. आम्हाला लसीची मागणी करायची होती. पण आम्हाला बोलण्याची परवानगी दिली गेली नाही.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही सुमारे 30 दशलक्ष लसांची मागणी करणार होतो, परंतु आम्हाला काहीही बोलू दिलं नाही. या महिन्यात 24 लाख लसीचे डोस मिळणार होते. मात्र, केवळ 13 लाख डोस मिळाले. आम्हाला रेमेडिसवीरदेखील देण्यात आले नाही. पीएम मोदी चेहरा लपवून पळत सुटले. पश्चिम बंगालमध्ये कोरोना प्रकरण वाढल्यानंतर केंद्र सरकारचं पथक पाठवण्यात आलं. परंतु जेव्हा गंगेमध्ये मृतदेह सापडले तेव्हा तिथे हे पथक का नाही पाठवण्यात आलं? याक्षणी देश अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. परंतु पंतप्रधान आकस्मिक दृष्टीकोन स्वीकारत आहेत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. (वाचा - Jagannath Pahadia Passes Away Due to COVID19: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन)

ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, केंद्र सरकारने फेडरल स्ट्रक्चरचे नुकसान केले आहे. ऑक्सिजन, औषध, लस, काहीही उपलब्ध नाही. जर आपण केंद्राच्या सूत्रांचे अनुसरण केले तर आपल्याला त्यासाठी दहा वर्षे वाट पाहावी लागेल. बंगालमध्ये लसीकरण गती कमी आहे कारण लस उपलब्ध नाहीत, आम्ही खासगी स्तरावर 60 कोटी रुपयांच्या लस खरेदी केल्या आहेत.

कोविडचा दुसरा डोस तीन महिन्यांनंतर का दिला जात आहे, याचे काही कारण आहे का? असा सवालही ममता यांनी यावेळी केला. दिल्लीचा राजा सर्वसामान्यांकडे पाहत नाही. सर्व काही अहंकाराने सुरू आहे. दरम्यान, आज बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीत प्रथमचं भाग घेतला होता.