मध्य प्रदेश मुख्यमंत्री - ( PC - ANI)

आतापर्यंत तुम्हाला ‘बँक’ म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी संस्था असंच माहित आहे. परंतु, मध्य प्रदेशात देशातील पहिली ‘टाइम बँक’ (Time Bank) सुरु होणार आहे. या बँकेत पैशाची नव्हे तर वेळेची देवाणघेवाण होणार आहे. या टाइम बँकेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही स्वेच्छिक सेवा देऊ शकता. त्याबदल्यात तुमच्या खात्यात तितकेच तास जमा केले जातील. या तासांचा उपयोग तुम्ही अशाचप्रकारच्या इतर सेवेसाठीही करू शकता. राज्य सरकारच्या अध्यात्म विभागाने शुक्रवारी हा आदेश जारी केला. मध्य प्रदेशमध्ये कलमनाथ सरकारने टाइम बँक सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात टाइम बँक सुरु करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत, असं अपर मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव यांनी सांगितलं. या बँकेचा अनेकांना फायदा होणार आहे. टाइम बँकेचा मुळ उद्देश लोकांमध्ये एकमेकांविषयी सेवाभाव वाढवणे हा आहे.

हेही वाचा - पीएमसी बॅंकेतील 9 लाख ठेवीदारांना मिळणार दिलासा; आरबीआयने घेतला हा मोठा निर्णय

एखाद्या व्यक्तीने गरजवंताची सेवा केली तर त्याच्या खात्यावर त्याने केलेली सेवा जमा होणार आहे. म्हणजेच जो कोणी एखाद्या गरजवंताची जितकी मदत करेल तितके तास त्याच्या खात्यात जमा होतील. तसेच जेव्हा त्याला मदतीची गरज असेल, तेव्हा याच जमा तासांच्या मदतीने त्याला टाइम बँक नेटवर्कमधून अन्य कुणाची मदत मिळेल.

तुम्ही एखाद्या वृध्द माणसाची एक तास काळजी घेतली किंवा एखाद्या विद्यार्थ्यांला एक तास शिकवले तर तेवढा वेळ तुमच्या खात्यात जमा होईल. ही योजना सर्व जिल्हात लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक टाइम बँक सुरु करण्यात येणार आहेत. ज्या लोकांना इतर लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.