LIC (Photo Credit - PTI)

आपण जीवन विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुम्हीला सतर्क राहण्याची गरज आहे. कारणं, एलआयसीने पॉलिसीधारकांसाठी (LIC Policyholders) एक संदेश जारी केला आहे. या मेसेजमध्ये एलआयसीने स्पष्टपणे म्हटलं आहे की, बनावट फोन कॉलद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ग्राहकांना अशा फोन कॉलबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एलआयसी अधिकारी, IRDAI अधिकारी बनून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे कंपनीने आपल्या ट्विट अकाऊंटवरून म्हटलं आहे. आपणास LIC किंवा IRDAI अधिकाऱ्याने कॉल केला आहे, असं सांगून पॉलिसीधारकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे योग्य सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. याशिवाय LIC ने काही महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या आहेत.

त्यानुसार पॉलिसीधारक कोणतीही माहिती मिळवण्यासाठी www.licindia.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. याशिवाय नजीकच्या एलआयसी शाखेत जाऊनही माहिती मिळवू शकतात. पोलिसीधारकांना फसवणूकीचे कॉल आल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्लाही एलआयसीने दिला आहे. तसेच तुम्ही spuriouscalls@licindia.com या ईमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवू शकता. (हेही वाचा - Income Tax Return फाईल करण्याची यंदाची डेडलाईन अवघ्या 4 दिवसांवर, अद्याप ITR भरला नसल्यास या गोष्टी ठेवा लक्षात)

एलआयसीने दिलेल्या सुचनांनुसार, कोणत्याही संशयास्पद कॉलवर जास्त वेळ बोलू नका. तसेच पॉलिसीमधील आवश्यक तपशील शेअर करू नका. जर कोणी बोनस, जास्त नफा अशा ऑफर देत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका. कंपनीने कोणतेही नवीन धोरण आधलेले नाही, असंही एलआयसीने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत कॉलद्वारे फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे एलआयसी, ईपीएफओ व्यतिरिक्त देशातील विविध बँका आपल्या ग्राहकांना वारंवार सतर्क राहण्याच्या सुचना देत असतात. आपण सावधगिरी न बाळगल्यास आपले मोठे नुकसान होऊ शकते, असंही कंपनीने म्हटलं आहे.