C T Ravi (PC- Facebook)

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात संतापाची लाट उसळत आहे. या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आता कर्नाटकातील भाजप मंत्री सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लोकांनी आपला संयम गमावला तर 2002 मध्ये झालेले गोध्रा दंगे पुन्हा होऊ शकतात, असं सी. टी. रवी यांनी म्हटलं आहे.

रवी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये रवी यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलंय की, लोकांनी आपला संयम गमावला तर काहीही होऊ शकतं. मागे वळून पाहा, 2002 मध्ये ग्रोधा येथे काय झालं होतं. जनतेने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असंही रवी यांनी म्हटलंय. (हेही वाचा - CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात संतापाची लाट, यूपी आणि दिल्लीत हिंसाचारामुळे 10 जणांचा मृत्यू)

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी लोक सरकारी संपत्तीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे आमचा संयम म्हणजे आमचा कमकुवतपणा समजू नका, असंही रवी यांनी म्हटलंय. रवी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच काँग्रेस नेते दिनेश गुंडू यांनी हे वादग्रस्त विधान म्हणजे एक प्रकारची धमकी असल्याचं म्हटलंय.