SL Dharmegowda (PC - Facebook)

Karnataka: कर्नाटक विधान परिषदेचे (Karnataka Legislative Council) उपसभापती (Deputy Speaker) एसएल धर्मेगौडा (SL Dharmegowda) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा मृतदेह चिक्कमगलुरु (Chikkamagaluru) रेल्वे रुळावर सापडला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही मिळाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटक विधानपरिषदेत चार आमदारांनी एसएल धर्मेगौडा यांना खुर्चीतून खाली खेचलं होतं. धर्मेगौडा यांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

रिपोर्टनुसार, एसएल धर्मेगौडा सोमवारी म्हणजेच 28 डिसेंबर ला संध्याकाळी 7 वाजता आपल्या सॅंट्रो कारमधून घरातून एकटे निघून गेले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला आणि नंतर त्याचा मृतदेह कदूरमधील गुणसागर येथील रेल्वे ट्रॅकवर सापडला. (हेही वाचा - Sharad Pawar on Farmers Protest: मोदी सरकारने शेतकरी आंदोलनासंदर्भात 30 डिसेंबरपर्यंत मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला विचार करावा लागेल - शरद पवार)

माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एचडी देवगौडा यांनी एसएल धर्मगौडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'राज्य विधानपरिषदेचे अध्यक्ष आणि जेडीएस नेते एस.एल. धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला धक्का बसला. धर्मगौडा हे एक शांत आणि सुसंस्कृत मनुष्य होते. त्यांच्या मृत्यूमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.'

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटक विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला कर्नाटक विधानपरिषेदत या विधेयकावरून जोरदार राडा झाला होता. यात काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले होते. भाजप आणि जनता दलाने असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवलं असल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं.