UPI Transaction Limit: युपीआय वापरकर्त्यांसाठी मोठे अपडेट; GPay, PhonePe व Paytm वर दिवसाला करू शकता फक्त 'इतकेच' व्यवहार, घ्या जाणून
United Payments Interface (Photo Credits: Twitter)

युपीआय (UPI) पेमेंट सिस्टीमने सर्वसामान्यांचे जीवन अतिशय सोपे झाले आहे. आजकाल तर भाजी विक्रेत्यापासुन ते मॉलमधील फॅशनेबल ब्रँड्सच्या शोरूमपर्यंत सर्व व्यवहारांसाठी युपीआयला पसंती दिली जात आहे. परंतु आता पेटीएम, जीपीए आणि फोनपे सारख्या विविध युपीआय पेमेंट अॅप्सवर युपीआय व्यवहारांची मर्यादा निश्चित केली आहे. युपीआय पेमेंट सिस्टममध्ये बँक-टू-बँक रिअल टाइम हस्तांतरण होते. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांनी यासाठी वेगवेगळ्या दैनंदिन मर्यादा निश्चित केल्या आहेत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युपीआय वरून दररोज 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येतो. काही लहान बँकांनी त्याची मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. (हेही वाचा: UPI पेमेंट करणं होणार अधिक सुलभ; RBI कडून Single Block and Multiple Debits सुविधा होणार सुरू)

युपीआय पेमेंटसाठी पेटीएम अॅप लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या अॅपवर युपीआय पेमेंटची दैनंदिन कमाल मर्यादा फक्त 1 लाख रुपये आहे. त्याच वेळी, तुम्ही या अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 20 युपीआय व्यवहार करू शकता. मात्र लक्षात घ्या पेटीएमवर युपीआय पेमेंट मर्यादा तासानुसार बदलते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुम्ही एका तासात पेटीएमवर 20,000 रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर करू शकत नाही. त्याच वेळी, प्रत्येक तासाला तुम्ही या अॅपद्वारे जास्तीत जास्त 5 युपीआय व्यवहार करू शकता.

पेटीएम व्यतिरिक्त, फोनपे (PhonePe) आणि गुगल पे (Google Pay) सारखे अॅप्स देखील युपीआय पेमेंटसाठी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. यावरील दैनंदिन हस्तांतरण मर्यादा 1 लाख रुपये आहे. जीपे एका दिवसात 10 व्यवहारांची सुविधा देते, तर फोनपेवर ही मर्यादा बँकेनुसार 10 किंवा 20 पर्यंत असते. या दोन्ही अॅप्सवर तासामध्ये किमान किंवा कमाल व्यवहारांची मर्यादा नाही. पण एक खास गोष्ट म्हणजे या अॅप्सवर जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची रिक्वेस्ट पाठवली तर हे अॅप्स ते थांबवतात.