तितली चक्रीवादळ : वादळांची नावं कोण आणि कशी ठरवतात ?
तितली चक्रीवादळ Photo credits : ( Photo Credit: ANI )

ओडिशाला सध्या चक्रीवादळाचा भयंकर तडाखा बसला आहे. या भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच या भागातील सुमारे 3 लाख नागरिकांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिसा आणि आंध्रप्रदेशाला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. या वादळाला 'तितली' असं नाव देण्यात आलं आहे. जगभरात भयंकर रूप धारण करणार्‍या या वादळांची नावं नेमकी कशी ठरतात ? यामागील कहाणीही तितकीच रंजक आहे.

वादळांना नावं कशी दिली जातात ?

आशिया खंडात वादळांना नावं देण्याची पद्धत 2000 सालपासून सुरू झाली. सामान्यपणे जेव्हा समुद्रामध्ये वादळ 61 किमी / तास अशा वेगामध्ये आदळते अशा स्वरूपातील वादळांना नावं दिली जातात.

ज्या भागामध्ये वादळ येतं त्या आजुबाजूचे प्रदेश वादळाला नावं देतात. हिंद महासागरातील वादळांना नावं देण्यासाठी भारत, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या देशांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक देशाकडून 8 नावं सुचवली जाते. ही नावं WMO म्हणजेच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनकडे सोपवली जातात.

रोटेशननुसार प्रत्येक वादळानंतर एकेका देशाने सुचवलेलं नाव वादळाला दिलं जातं. उत्तर अटलांटिक, पूर्वोत्तर पॅसिफिक, मध्य-उत्तर पॅसिफिक, पश्चिम-उत्तर पॅसिफिक, उत्तर हिंद महासागर, दक्षिण-पश्चिम हिंद महासागर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक अशा जगभरातील ९ भागांमधून वादळांना नाव देण्यासाठी देशांची वर्गवारी केलेली आहे.

cyclone name List

photo credits : public.wmo.int

तितली नाव पाकिस्तानच्या यादीमधून

ओडिशाला बसलेल्या तडाख्याला 'तितली' हे नावं पाकिस्तानने सुचवलेल्या यादीमधून घेण्यात आलं आहे. पाकिस्‍तानने फानूस, लैला, नीलम, वरदाह, तितली आणि बुलबुल ही नावं सुचवली आहेत.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण तामिळनाडूमध्ये आलेल्या चक्रीवादळाला 'ओखी' हे नाव बांग्लादेशने दिले होते. त्यापूर्वी बांग्लादेशमध्ये आलेल्या वादळाला थायलंडने 'मोरा' हे नाव सुचवले आहे. त्याचा अर्थ सी स्टार असा होतो.