SBI, PNB, Canara Bank (PC - Facebook)

Govt Bank Profit: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्याने 2022-23 या आर्थिक वर्षात एक लाख कोटींचा आकडा पार केला आहे. यातील निम्म्याहून अधिक योगदान देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) कडून आले आहे. बँकेने जाहीर केलेल्या निकालांचे विश्लेषण करताना असे आढळून आले की 2017-18 या आर्थिक वर्षात सरकारी बँकेने 85,390 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. तर 2022-23 या आर्थिक वर्षात हा आकडा 1,04,649 रुपयांवर पोहोचला आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात देशातील 12 बँकांच्या नफ्यात 57 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2021-22 मध्ये बँकांनी 66,539.98 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. टक्केवारीनुसार, 2022-23 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा सर्वाधिक 126 टक्क्यांनी वाढून 2,602 कोटी रुपये झाला आहे. यानंतर UCO बँकेचा नफा 100 टक्क्यांनी वाढून 1,862 कोटी रुपये झाला आणि बँक ऑफ बडोदाचा नफा 94 टक्क्यांनी वाढून 14,110 कोटी रुपये झाला. (हेही वाचा - Easy to Exchange ₹ 2,000 Notes: दोन हजार रुपयांची नोट बदलायची आहे? फॉर्म, ओळखपत्राची गरज नाही, State Bank Of India ने दिली माहिती; घ्या जाणून)

तथापी, स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा 2022-23 मध्ये 50,232 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत बँकेच्या नफ्यात 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी फक्त पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) नफ्यात घट झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात बँकेचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी घसरून 2,507 कोटी रुपयांवर आला आहे.

दरम्यान, कॅनरा बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षात 10,604 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पंजाब अँड सिंध बँक रु. 1,313 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया रु. 1,582 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक रु. 2,099 कोटी, बँक ऑफ इंडिया रु. 4,023 कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया रु. 8,433 कोटी आणि इंडियन बँक रु. 5,282 कोटी झाली आहे. बँकांच्या नफ्यात वाढ होण्यामागील कारण म्हणजे आरबीआयने व्याजदरात केलेली वाढ आणि कर्जात सातत्याने होणारी वाढ.