Tablets, Condoms (PC - Pixabay)

Medicines Price Hike: घाऊक किंमत निर्देशांकात बदल झाल्यानंतर औषधांच्या किमती वाढतील, अशी अपेक्षा होती आणि तसं झालंही आहे. भारतात नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने औषधांच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन किमती 1 एप्रिल 2023 पासून लागू झाल्या आहेत. औषधांच्या किमतीत 10 ते 30 टक्के वाढ करण्यात आली आहे.

औषधांच्या किमतीत हा बदल डब्ल्यूपीआय 12 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर करण्यात आला आहे. या संदर्भात गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पॅरासिटामॉलच्या गोळ्या, सिरप आणि इंजेक्शन्स सगळ्याच महाग झाल्या आहेत. अँटिबायोटिक औषध अजिथ्रोमायसिन, वेदना कमी करण्यासाठी दिले जाणारे ट्रामाडॉलचे इंजेक्शन, डीपीटी लस, अगदी फॉलिक अॅसिड औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. (हेही वाचा - New Financial Year 2023-24: 1 एप्रिल पासून सुरू होणार्‍या नव्या आर्थिक वर्षामध्ये काय स्वस्त आणि काय महागणार; पहा लागू होणारे हे नवे नियम)

टॅन्स इंजेक्शन, व्हिटॅमिन औषधे, डॉक्सीसायक्लिन औषधही महाग झाले आहे. बुरशीच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अॅम्फोटेरिसिन बीच्या इंजेक्शनची किंमतही वाढली आहे. आयक्लोफेनाक, हृदयरुग्णांना दिले जाणारे एटोरवास्टॅटिन आणि अमोक्सिसिलीनच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. जेस्ट्रोन औषध, कॅल्शियम कार्बोनेट औषध, कंडोमच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.

तथापी, मधुमेही रुग्णांसाठी इन्सुलिन पेनच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना देण्यात येणारे ग्लुकोज आणि सोडियम क्लोराईड आणि हृदयातील अडथळे उघडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. बेअर मेटल स्टेंटची किंमत 10509 रुपये झाली आहे, तर ड्रग एल्युटिंग स्टेंटच्या एका युनिटची किंमत 38,265 रुपये झाली आहे.

जागतिक किंमत निर्देशांक घाऊक बाजारात विकत घेतलेल्या आणि विकलेल्या वस्तूंमधील बदल दर्शवतो. ज्याच्या आधारावर भारतातही वस्तूंची किंमत ठरवली जाते. हे महागाई मोजण्याचे प्रमाण आहे. हा घाऊक दरातील बदल असला तरी या यादीतील वाढीव किंमतीला सीलिंग प्राईस म्हणतात, याचा अर्थ या किमतीपेक्षा जास्त किंमतीला औषध विकले जाऊ शकत नाही. पण किरकोळ विक्रेत्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर ते औषध कमी दरात विकण्याचा निर्णय घेऊ शकतात.