भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सेवेत आणखी एक नवी सेवा देऊ करत आहे. रेल्वेच्या इतिहासात ही सेवा पहिल्यांदाच राबवली जात आहे. या सेवेनुसार रेल्वे प्रवाशांना चालत्या गाडीमध्ये मसाज सेवा (Massage Service) पूरवली जाणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. ही सेवा इंदौर येथून रवाना होणाऱ्या 39 ट्रेनमध्ये उपलब्ध असणार आहे. हा प्रस्ताव वेस्टर्न रेल्वे झोन रतलाम डिव्हिजनकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांतील प्रवाशांना आता चांगलीच मालीश मिळणार आहे.
नवभारत टाईम्सने अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सेवा प्रवाशांना मिळणार आहे. ही सेवा देण्यात आल्यामुळे केवळ रेल्वेचे उत्पन्नच वाढणार नाही तर प्रवासी संख्येतही वाढ होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांना वाटतो. चालत्या रेल्वेत मालीश ही सेवा पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे. मालीश सेवेमुळे भारतीय रेल्वेला वर्षाकाठी 20 लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळे असा अंदाज आहे. 20,000 सर्व्हिस प्रोवायडर्सना तिकीट विकल्यानंतर 90 लाख रुपये किमतीच्या तिकिटांची अतिरिक्त विक्रिही होईल असा कयास रेल्वे प्रशासनाचा आहे. (हेही वाचा, IRCTC Special Tourist Train: भारत दर्शन - केवळ 9,900 रुपयांत फिरा देशभर, IRCTC ची पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर)
रेल्वे बोर्डाच्या मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन्सचे निदेशक राजेश बाजपेई यांनी माहिती देताना सांगितले की, रेल्वेने अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदाच साईन केले आहे.