दिशाभूल तसेच खोट्या जाहिराती करणे पडणार महागात; सेलिब्रिटींना होऊ शकतो तुरुंगवास, 10 लाखाचा दंड
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

ग्राहक संरक्षण विधेयक 2019 (Consumer Protection Bill 2019) मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या अटींनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे समर्थन करणारे उत्पादक आणि सर्व्हिस प्रदाते आणि ती जाहिरात करणारे सेलेब्रिटी यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. टेलिव्हिजन, रेडिओ, प्रिंट, होर्डिंग जाहिराती, ई-कॉमर्स, डायरेक्ट सेलिंग आणि टेलमार्केटिंग यासह कोणत्याही माध्यमांद्वारे दिशाभूल जाहिराती प्रसारित केल्या जात असतील, तर या विधेयकानुसार त्या दंडास पात्र ठरतील. उत्पादन किंवा सेवेचे चुकीचे वर्णन, चुकीची हमी, उत्पादनाची किंवा सेवेची प्रकृति, पदार्थ, प्रमाण किंवा गुणवत्ता याबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणे अशा सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत.

यामध्ये दिशाभूल करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करणार्‍या किंवा त्यांचे प्रमोशन करणाऱ्या सेलिब्रिटींना 10 लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो. जर एखादा उत्पादक आणि सेवा पुरवठा करणारे दोषी आढळले तर त्यांनाही दहा लाख रुपये दंड भरावा लागेल. सोबत जास्तीत जास्त 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. सेलिब्रिटी, उत्पादक आणि सेवा पुरवणारे लोक यांनी अशा प्रकारचे गुन्हे चालू ठेवल्यास, प्राधिकरण 50 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 5 वर्षापर्यंतची शिक्षा ठोठावू शकतो. (हेही वाचा: कोलगेट-सेन्सोडाईन ट्युथपेस्ट कंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल; FDA ने जप्त केला साडेचार कोटींचा साठा)

याबाबत बोलताना आदित्य बिर्ला कॅपिटलचे मुख्य विपणन अधिकारी अजय कक्कर म्हणतात, ‘कायदा तयार करण्याच्या दृष्टीने हे पहिले महत्वाचे पाऊल आहे. मला असेही वाटते की जाहिरातींना समर्थन देणाऱ्या लोकांवर नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी ठेवणे, हे जबाबदार जाहिराती आणि ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेससाठी आणखी एक स्वागतार्ह पाऊल आहे.’ दरम्यान याआधी दिशाभूल करणाऱ्या अनेक जाहिरातींमुळे ग्राहकांचे नुकसान झाले आहे. आपल्या आवडत्या सेलेब्जची जाहीरात म्हणून आपण उत्पादन विकत घेतो मात्र त्यामुळे आपले नुकसानच झाले आहे अशा प्रकारची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आता अशा घटनांना आळा बसेल.