7th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदवार्ता; मोदी सरकारने जारी केले नवे आदेश
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतिक्षा आता संपली आहे. मोदी सरकारने (Modi Government) पेन्शनर्ससाठी एक खुशखबर दिली आहे. महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. त्यामुळे आता सशस्त्र सेना, अखिल भारतीय सेवा आणि रेल्वेच्या निवृत्तीवेतनधारकांसह केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक पेन्शनमध्ये 28 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता देण्यात येईल. याशिवाय मागील वर्षी जानेवारीपासून थकलेला महागाई भत्ता मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. (7th Pay Commission Latest News Today: केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 28%; पहा त्यामुळे पगारात नेमकी कशी वाढ होणार?)

केंद्रीय कॅबिनेटच्या डिपार्टमेंट ऑफ पेन्शनर्स वेलफेयरने पेन्शनधारक आणि फॅमेली पेंशनर्ससाठी नवा आदेश जारी केला आहे. ज्याअंतर्गत आता 1 जुलै 2021 पासून सर्व पेन्शनर्सच्या 17% भत्तामध्ये अधिक 11% वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 जुलै 2021 पासून निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येणारा महागाई भत्ता 28% पर्यंत वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, कोविड कालावधीत सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA मध्येही होणार वाढ)

14 जुलै 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट समितीने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देण्यात येणारा महागाई भत्ता 28% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 संकटामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता (डीए) आणि पेन्शनधारकांना मिळणारा डीआर फ्रिज करण्यात आला होता. 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून थकीत असलेला महागाई भत्त्याला स्थगिती मिळाली होती. मात्र आता पुन्हा महागाई भत्ता मिळणार असल्याने कर्मचारी, पेन्शनधारक सुखावले आहेत.