
7TH CPC Latest News: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (Dearness Allowance) किंवा डीए (DA) मध्ये वाढ होण्यास अजून काही कालावधी जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यामुळे वाढलेल्या महागाई भत्त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिव गोपाल मिश्रा सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीवर केंद्र सरकारशी चर्चा करत आहे. त्यांनी सांगितले की, डीएमध्ये वाढ होण्याची घोषणा मे महिन्याऐवजी जून महिन्यात होईल. डीएनएशी बोलताना त्यांनी सांगितले की, डीएमध्ये एप्रिल अखेरपर्यंत आणि मे च्या मध्यापर्यंत वाढण्याची शक्यता होती. मात्र कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे ही घोषणा विलंबाने होणार आहे. जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंतची महागाई पाहता केंद्र सरकारी कर्मचारी डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होण्याची आशा करु शकतील, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जुलै 2021 पर्यंत आपल्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता वाढविणे थांबवले होते. तसंच केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्याचा हप्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासोबतच 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी जारी होणार्या डीएच्या पुढील हप्त्यांचे पैसे देणे देखील थांबविण्यात आले होते. (केंद्रीय कर्मचार्यांना 1 जुलै पासून थकीत DA मिळण्याची शक्यता; पगारात होणार 'इतकी' वाढ)
1 जुलै 2021 नंतर महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा हप्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल तेव्हा 1 जानेवारी 2020, 1 जुलै आणि जानेवारी 2021 या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत विचार करुन वाढ करण्यात येईल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. 1 जुलै 2021 पासून भत्ता समान वाढीव दराने देण्यात येईल. सध्या याचा परिणाम सुमारे 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांवर झाला आहे.