India's COVID19 Tally Crosses 33 Lakh Mark: चिंताजनक! भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 33 लाखांचा टप्पा; आतापर्यंत 60 हजार 472 मृत्यूची नोंद
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात (India) कोरोनाचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ज्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 75 हजार 760 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 1 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 33 लाख 10 हजार 235 वर पोहचली आहे. यापैकी 60 हजार 472 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 लाख 23 हजार 772 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात 7 लाख एक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. हे देखील वाचा-Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 14,888 नवे रुग्ण, 295 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशात ज्याप्रकारे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच कोरोनामुक्तांच्या संख्येतही चांगली सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.