Indian Navy Recruitment 2019 | Representational Image | (Photo Credits: IANS)

भारतीय नौसेनेत काम करण्याची इच्छा आहे. पण शिक्षण कमी असल्याने मागे पडत आहात? तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. नौसेनेत अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. अगदी दहावी पास उमेदवारांसाठी देखील विशेष संधी उपलब्ध आहेत. दहावी पास उमेदवारांना नौसेनेत शेफ, सेवक आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करता येईल.

नौसेना सप्टेंबर 2019 मध्ये भरती प्रक्रिया सुरु करेल, अशी अधिकृत माहिती सुरक्षा मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. यासाठी कॅम्प्युटर वर आधारित आयएनईटी परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी तुम्ही www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी दुसरी कोणतीही वेबसाईट किंवा अॅप उपलब्ध नाही. (MUHS Recruitment 2019: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीच्या विविध संधी; जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती)

योग्यता/पात्रताः

1 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2003 या काळात जन्मलेले अविवाहित तरुण या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासाठी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना वैयक्तिक, शैक्षणिक माहिती अपडेट करावी. तसंच अर्जाला येणाऱ्या प्रश्नांना वेळीच उत्तर द्यावे लागेल.

शुल्क:

सर्व उमेदवारांना 60 रुपये + जीएसटी असे माफक शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.

अशी असेल भरती प्रक्रीया

आयएनईटी परीक्षेतून शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील टप्पा पार करावा लागेल. त्यात शारीरिक स्वास्थ्य आणि प्रारंभिक वैद्यकीय तपासणी याचा समावेश असेल. या टप्प्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येतील. या निवडलेल्या उमेदवारांना ओडिशातील आईएनएस चिल्का या प्रशिक्षण संस्थेत बोलवण्यात येईल. येथे मेडिकल तपासणीतील उत्तीर्णता लक्षात घेऊन उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. त्यानंतर 2020 पासून प्रशिक्षण सुरु होईल.

अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.