Light Combat Helicopter (PC - Twitter)

Light Combat Helicopter: भारतीय हवाई दलाला (Indian Air Force, IAF) सोमवारी नवी ताकद मिळणार आहे. भारतीय हवाई दलातील लढाऊ कौशल्यांना चालना देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची (Light Combat Helicopter) पहिली तुकडी आज दाखल करण्यात येणार आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वदेशी हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेला मोठी चालना मिळेल.

सैन्यात सामील होणारे नवीन हेलिकॉप्टर हवाई युद्ध करण्यास सक्षम आहेत. तसेच ते ड्रोन आणि चिलखती टँकर हाताळण्यासाठी हवाई दलाला मदत करतील. आजच्या समारंभाचे नेतृत्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी देखील उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा - Jammu-Kashmir Update: पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद, तर एक CRPF जवान जखमी)

या वर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने 3,887 कोटी रुपयांना 15 स्वदेशी विकसित LCH खरेदी करण्यास मंजुरी दिली. या 15 हेलिकॉप्टरपैकी 10 भारतीय हवाई दलासाठी आहेत आणि पाच लष्करासाठी आहेत. अधिका-यांनी सांगितले की ते शस्त्रे आणि इंधनासह 5,000 मीटर उंचीवर उड्डाण करू शकते.

लडाख आणि वाळवंटी भागात तैनात करण्यात येणार -

हे हेलिकॉप्टर सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने विकसित केले असून ते प्रामुख्याने उच्च उंचीच्या भागात तैनात करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लडाख आणि वाळवंटी प्रदेशात हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणावर तैनात केले जातील. भारतीय हवाई दलाने गेल्या तीन-चार वर्षांत चिनूक, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि आता एलसीएचच्या समावेशासह अनेक हेलिकॉप्टरचा समावेश केला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, भारतीय हवाई दल आता चिनूक हेलिकॉप्टरमध्ये महिला वैमानिकांना देखील तैनात करत आहे, जे उत्तर आणि पूर्व सीमेवर नियमित पुरवठा मोहीम राबवत आहेत. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लिमिटेड सीरिज प्रोडक्शन (LSP) हे स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि उत्पादित केलेले अत्याधुनिक आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर आहे.