Nitin Gadkari (PC - ANI/Twitter)

Nitin Gadkari On Congress: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना हटके उत्तर दिलं आहे. नितीन गडकरी यांना एकदा एका नेत्याने काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्याला उत्तर देताना त्यांनी त्या पक्षात जाण्यापेक्षा विहिरीत उडी घेईन, असं म्हटलं आहे.

काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या कामाच्या तुलनेत भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांत देशात दुप्पट काम केल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुक्रवारी महाराष्ट्रातील भंडारा येथे आयोजित सभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपमधील सुरुवातीचे दिवस आठवले आणि पक्षाच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयीही सांगितले. (हेही वाचा - Nehru Museum Name Change: नवी दिल्लीतील नेहरू मेमोरियल संग्रहालयाच्या नामांतरणावरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, 'भाजपला इतिहास नष्ट करायचा आहे')

दरम्यान, यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांना दिलेल्या सल्ल्याची आठवण झाली. ते म्हणाले, जिचकार यांनी मला एकदा सांगितले की, तुम्ही पक्षाचे खूप चांगले कार्यकर्ता आणि नेते आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये सामील झालात तर तुमचे भविष्य खूप उज्ज्वल असेल, परंतु मी त्यांना सांगितले की मी काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा विहिरीत उडी मारील. माझा भाजपा आणि त्याच्या विचारसरणीवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे मी भाजप पक्षासाठी काम करत राहीन.

तथापी, नितीन गडकरी म्हणाले की, आपण आपल्या देशाच्या लोकशाहीचा इतिहास विसरता कामा नये. भविष्यासाठी आपण भूतकाळातून शिकले पाहिजे. आपल्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने 'गरिबी हटाओ'चा नारा दिला, पण तो फक्त आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या त्यांच्या व्हिजनबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत देशाचे भविष्य खूप उज्ज्वल असल्याचे सांगितलं.