Heavy Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

IMD Weather Update: देशाच्या उत्तर आणि मध्य भागांतील बहुतांश भागांतून पावसाची क्रिया जवळपास थांबली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, राष्ट्रीय राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. येत्या तीन दिवसांत मध्य भारतातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय पूर्व भारतातील राज्यांमधूनही मान्सून माघार घेणार आहे. मात्र, पुढील पाच दिवस दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD नुसार, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि माहे येथे 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस आणि गडगडाट होईल. याशिवाय आजपासून 17 ऑक्टोबरपर्यंत दक्षिण आतील कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकात 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान, तेलंगणा आणि कोस्टल कर्नाटकमध्ये 14 आणि 15 ऑक्टोबरला, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये 14 ऑक्टोबरला, लक्षद्वीपमध्ये 18 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबारमध्ये 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा - Asaduddin Owaisi on Hijab Row: माझं स्पप्न आहे की, एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान व्हावी; ज्यांना बिकिनी घालायची आहे त्यांना घालूद्या - असदुद्दीन ओवेसी)

दरम्यान, शुक्रवारी सकाळी दिल्लीत आकाश निरभ्र होते. येथे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत होती. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सकाळी 8.30 वाजता हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 84 टक्के नोंदवले गेले. गुरुवारी किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 18.5 अंश सेल्सिअस आणि 30.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्याचवेळी, सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड फोरकास्टिंग रिसर्च (SAFAR) च्या आकडेवारीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी 9.15 च्या सुमारास 128 नोंदवला गेला, जो मध्यम श्रेणीमध्ये येतो.