Asaduddin Owaisi on Hijab Row: कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विभागले गेले आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे, मात्र याचदरम्यान असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ओवेसी म्हणाले, 'माझं स्पप्न आहे की, एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान व्हावी. असं म्हटल्यावर अनेकांची डोकेदुखी आणि पोटदुखी वाढते. मी असे का म्हणू नये? हे माझे स्वप्न आहे. काय चुकीच आहे त्यात. पण तुम्ही म्हणता की हिजाब घालू नये. मग मी काय घालावे? बिकिनी? तुम्हालाही ते घालण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मुलींनी हिजाब घालू नये आणि मी दाढी काढावी असे तुम्हाला का वाटते?
असदुद्दीन ओवेसी यांनी पुढे बोलताना सांगितले की, मुस्लिम मुलीने हिजाब घातला तर त्याचा अर्थ तिच्यात बुद्धी कमी आहे असे नाही. तुम्ही हैदराबादमध्ये आलात तर तुम्हाला दिसेल की येथील सर्वात बदनाम ड्रायव्हर आमच्या बहिणी आहेत. त्यांच्या मागे गाडी घेण्याची जोखीम कोणीही घेऊ शकत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी माझ्या ड्रायव्हरला सावधपणे गाडी चालवण्यास सांगितले आहे. तुम्ही मुलीच्या बाईकच्या मागे बसा आणि मग बघा त्यांच्यावर काही दबाव येतो का? (हेही वाचा - केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावर नागरिकांचा डेटाबेस तयार करण्याच्या तयारीत; NRC ची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता)
आम्ही मुलींवर दबाव आणतो का?
ओवेसी म्हणाले की, आमच्यावर आरोप केले जात आहेत की आम्ही मुलींवर दबाव आणतो. शेवटी आजच्या जगात कोण कोणाला घाबरतो? त्यांनी पुन्हा एकदा हिजाबची तुलना हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांच्या प्रतीकांशी केली. जेव्हा हिंदू, शीख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्या चिन्हांसह प्रवेश दिला जातो, तेव्हा मुस्लिमांना का रोखले जाते, असा सवाल त्यांनी केला. असे झाले तर ते मुस्लिमांबद्दल काय विचार करतील. त्यांना एकच संदेश जाईल की मुस्लिम आमच्या खाली आहेत. यावर भाजप नेते सीटी रवी म्हणाले की, ओवेसी हे अतिरेक्याचे समर्थन करतात, जे भारतात चालणार नाही.
लादेन आणि तालिबानचा उल्लेख करत भाजपची टीका -
सीटी रवी म्हणाले, 'मला ओवेसींना विचारायचे आहे, तुम्ही कुराणाच्या नावावर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तालिबानला पाठिंबा देता का? अल्लाहच्या नावाने दहशतवाद वाढवणाऱ्या लादेनचे तुम्ही समर्थन करता का? अल्लाहच्या नावाखाली अनेक लोक दहशतवाद वाढवत आहेत, पण भारतात तो होऊ दिला जाणार नाही.'