धक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : YouTube)

सर्वसाधारण असा समज असतो की, रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणारे लोक हे साधारण अप्पर मिडल क्लास (उच्च मध्यम वर्गीय) लोक असतात. रेल्वेच्या एसी कोचची तिकिटे ही थोडी महाग असतात, त्यामुळे सर्व लोकांना ती परवडतीलच अशी नाहीत. मात्र नुकतीच अशा प्रवाशांबाबत रेल्वेने सादर केलेली एक आकडेवारी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तर ही आकडेवारी आहे ती रेल्वेच्या एसी डब्यातून चोरीला गेलेल्या सामानाची. देशभरातील रेल्वेच्या एसी डब्यातून 2017-18 या वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचे सामान चोरीला गेल्याचे समोर आले आहे. तर याच थोड्या श्रीमंत आणि समजदार लोकांनी रेल्वेच्या चादरी, ब्लँकेट, टॉवेल, बेडरोल आणि उश्यादेखील चोरल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आधी एका वर्षात रेल्वेतील देशभरात जवळपास 21 लाख 72 हजार अंथरूण-पांघरूण गायब झाली आहेत. यात 12 लाख 83 हजार टॅावेल आणि 4 लाख चादरी आणि 3 लाखांहून अधिक उश्यांच्या अभ्र्यांचा समावेश आहे. याचसोबत 56 हजार उश्या आणि 46 हजार ब्लँकेट असे 14 करोड रुपयांचे सामान चोरी झाले आहे. (हेही वाचा 40 नव्या एसी लोकलसह मुंबई रेल्वेसाठी 65 हजार कोटींची गुंतवणूक : रेल्वेमंत्री)

रेल्वेतील एसी डब्यातून या सर्व सामानासह शौचालयामधील नळ, मगही चोरीला गेले आहेत. चोरीच्या या प्रकारामुळे उच्च श्रेणीतील प्रवाशांसाठी, उत्तम सुविधा देण्यात रेल्वेला अडचणी येत आहेत. रेल्वेच्या AC कोचमध्ये दररोज 3 लाख 90 हजार बिछान्यांची सोय केली जात आहे, मात्र आता रेल्वेतील हे सामान सुरक्षित राहील, यासाठी रेल्वेकडून नेमकी काय उपाययोजना केली जाईल ते पाहणे गरजेचे आहे.