मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. दिवसाला करोडोंची उलाढाल होत असलेले हे शहर केंद्र सरकारसाठी फारच महत्वाचे आहे. म्हणूनच शहरावर मेहरबान होत सरकारने मुंबईसह उपनगरातील लोकलसेवेचा विकास व्हावा यासाठी 60 ते 65 हजारांची गुंतवणूक केली आहे. याचबरोबर केंद्र सरकार आता मुंबईमध्ये 40 नव्या एसी लोकल उपलब्ध करून देणार आहे. ही माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात दिली.
मुंबईमधील वाढत्या लोकसंख्येसाठी वाहतुकीचे सर्वात उत्तम साधन म्हणून लोकलकडे पहिले जाते. खिशाला परवडणाऱ्या दरात मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही लोकलने पोहचू शकता. अशातच एक कोपरा या लोकलसेवेपासून वंचित राहिला होता तो म्हणजे उरण. केंद्र सरकारने यासाठी नेरूळ-उरण हा रेल्वे प्रकल्प सुरु केला. यातील अपेक्षेपेक्षा कमी कालावधीमध्ये नेरूळ-खारकोपर या लोकलचे काल लोकार्पण झाले. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सध्याच्या मुंबईच्या रेल्वे स्थितीवर भाष्य केले.
चालू अर्थसंकल्पात मुंबई उपनगरातील रेल्वेची अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली होती, यासाठी महाराष्ट्र सरकार हे पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी सहकार्य करत असल्याने चालू कामांसह अनेक नव्या कामांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. अशी माहिती गोयल यांनी दिली. यावेळी त्यांनी वसई रोड-दिवा-पनवले-पेण मार्गावरील 8 मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिटचे (मेमु) उद्घाटन केले. तसेच प्रवाशांना लागणाऱ्या इतर सुविधांचे उद्घाटन केले. या सुविधांमध्ये 23 रेल्वेस्टेशनवरील 6 पादचारी पूल, 49 सरकते जिने, 10 लिफ्टचा समावेश आहे. तर सहाहून अधिक स्वच्छतागृहांचा समावेश आहे. याचबरोबर 318 एटीव्हीएमचे 77 स्टेशनवर उद्घाटन करण्यात आली आहेत. 6 स्थानकांवर 206 सीसीटीव्ही कॅमरे आणि भिवंडी रोड आणि नावडे रोडवर तिकीट कार्यालयाच्या विकासकामांतील उद्घाटनाचा समावेश आहे.