गोवा मध्ये आजपासून पर्यटन व्यवसाय सुरू; मात्र 'या' नियमांचंं पालन करणार्‍यांनाच मिळणार प्रवेश
Goa tourism. (Photo Credit: Facebook)

भारतामध्ये देशा-परदेशातील पर्यटकांचं आकर्षण असणार्‍या गोव्यामध्ये आता पुन्हा पर्यटनाला सुरूवात होत आहे. कोविड 19 शी सामना करत आता गोव्याने राज्यातील पर्यटन आज (2 जुलै)पासून पुन्हा सुरू करण्यास सुरूवात केली आहे. मागील साडे तीन महिन्यांपासून ठप्प असलेला हा पर्यटन व्यवसाय आता हळूहळू पुन्हा पुर्वपदावर आणण्यास सुरूवात होत आहे. गोवा पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी याबाबत काल माहिती दिली आहे.

गोव्यामध्ये पर्यटनाला सुरूवात झाली असली तरीही कोविड19 चा धोका पाहता आता गोवा राज्य सरकराकडून पर्यटकांसाठी विशेष SOP जारी करण्यात आली आहे. यामध्ये कोविड टेस्ट, हॉटेल बुकिंग याबाबत नियम देण्यात आले आहेत. त्याची पूर्तता केल्यानंतरच पर्यटकांना गोव्यामध्ये फिरण्याची मुभा असेल.

गोव्यामध्ये पर्यटनासाठी काय आहेत नियम?

  • विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही.
  • गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं आगाऊ बुकिंग करावं लागणार आहे. हे बुकिंग पुढे पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल.
  • गोव्यात येताना कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे.
  • कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास त्याची चाचणी करून घेणं बंधनकारक असेल.
  • कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास गोव्यात उपचार घ्यावे लागतील किंवा मूळ राज्यात परत जावे लागेल.
  • कोविड संकटात पर्यटनासाठी सरकारमान्य नसलेल्या होम स्टे किंवा किंवा हॉटेल्समध्ये पर्यटकांना थांबण्याची मुभा नसेल.

दरम्यान सध्या कोरोनाचं संकट पाहता नव्या SOP प्रमाणे केवळ 250 हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गोव्यामध्ये लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात कोरोनावर 100% नियंत्रण मिळवण्यास राज्याला यश आलं होतं. मात्र श्रमिक ट्रेन्स आणि अन्य वाहतूक सुरू झाल्यानंतर गोव्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार झाला. मात्र अशा कठीण परिस्थितीमध्येही कोरोनाचा सामना करत पर्यटन व्यवसाय पुन्हा करण्याला आता गोव्याने हिरवा कंदिल दाखवला आहे.