पाकिस्तानी मुलीच्या मदतीसाठी गौतमने उचलली 'गंभीर' पावलं; operation करता visa ची केली तजवीज
Gautam Gambhir | (Photo Credits: IANS)

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आपल्या सडेतोड वागणुकीसाठी खूप प्रसिद्ध आहे. कित्येकदा तर मैदानावरसुद्धा त्याने अरे ला कारे करताना मागे पुढे पाहिलेलं नाहीये. मग तो कामरान अकमल, शाहिद आफ्रिदी सोबतचा वाद असो किंवा अगदी विराट कोहली (Virat Kohli) सोबतचा. आपल्या खेळासोबतच आपल्या वागणुकीमुळेसुद्धा तो बऱ्याच वेळा चर्चेत राहिलेला आहे. तसेच पाकिस्तानकडून भारतविरोधी होणाऱ्या भूमिका असतील किंवा लष्करावर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा असेल, त्याने आपले मत आणि निषेध वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. पण या वेळी त्याचं एक वेगळच रूप समोर आलं आहे. पाकिस्तानातल्या एका सहा वर्षाच्या चिमुरडीला भारतात वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्याने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaiashankar) यांना पत्र लिहून व्हिसा देण्यासंदर्भात विनंती केली होती.

 

गौतम गंभीरने यासंदर्भात एक पत्र परराष्ट्र मंत्रालयाला पाठवले होते. ओमैमा अली असे या मुलीचे नाव असून तिला आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळण्यासाठी इस्लामाबाद उच्चयुक्तालयाकडे चौकशी करा अशी विनंती त्या पत्रात केली होती. मोहम्मद युसूफ या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनी यासंदर्भात गंभीरला फोन केला असताना त्या मुलीला त्वरित ओपन हार्ट शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे कळवले होते. (हेही वाचा. कलम 370 च्या मुद्द्यावर गौतम गंभीर आणि शाहिद अफ्रिदी यांच्यात Twitter युद्ध, PoK प्रश्नी केली कान उघाडणी)

व्हिसा मंजूर झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानल्यावर गंभीर पुढे म्हणाला, ''माझा वाद हा पाकिस्तान सरकार, आय.एस.आय. आणि तिथल्या दहशतवादी संघटनांशी आहे. तिथल्या सामान्य जनतेशी माझं काही वितुष्ट नाही.'' गौतम गंभीर 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर दिल्लीमध्ये जिंकून लोकसभेचा खासदार झाला आहे.