कलम 370 च्या मुद्द्यावर गौतम गंभीर आणि शाहिद अफ्रिदी यांच्यात Twitter युद्ध, PoK प्रश्नी केली कान उघाडणी
Gautam Gambhir (Photo Credits-ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारने सोमवारी राज्य सभेमध्ये जम्मू-काश्मीरला (Jammu-Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत झाले. पण पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) याला मात्र मिरच्या झोंबल्या. आफ्रिदीने भारतीय सरकारच्या या निणर्याबाबद संयुक्त राष्ट्रांवर टिका केली आणि अमेरिकेने या प्रकरणामध्ये लक्ष द्यावे, असेही ट्विटरद्वारे सुचवले. आफ्रिदीने लिहिले की, “संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मिरी जनतेला त्यांचे अधिकार द्यायला हवेत. आपल्यासारखं त्यांनाही स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांची स्थापना का झाली आहे आणि ते आता झोपले आहेत का? काश्मीरमध्ये मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रामकता आणि गुन्ह्यांची दखल घ्यायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मध्यस्थी करायला हवी”, असे ट्विट आफ्रिदीने केले होते. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला. (जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवला तरीही लढाई सुरु ठेवणार, पाकिस्तानची प्रतिक्रिया)

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या कलम 370 केंद्र सरकारने सोमवारी तटस्थ केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 'जम्मू-काश्मीर हा दिल्ली आणि पुडुचेरीसारखा केंद्रशासित प्रदेश राहील, म्हणजे तेथे विधानसभा होईल. त्याच वेळी लडाख चंडीगडसारखे होईल, जेथे विधानसभा होणार नाही. दरम्यान, आफ्रिदीच्या ट्विटवर उत्तर देत गंभीर याने म्हटले की, ''भारताच्या या ऐतिहासिक निर्णयावर आफ्रिदीने टीका केली आहे. त्याला हे मानवतेचा गळा घोटणारे पाऊट वाटते. पण, हे पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये रोज घडते, याचा उल्लेख करायला तो विसरला आहे. पोरा (आफ्रिदीला उद्देशून), तू या सगळ्याची काळजी करू नको. लवकरच तोही प्रश्न आम्ही लवकरच सोडवू."

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांना टॅग करत गंभीरने म्हटले होते की, “जे कोणालाही करता आले नाही ते आम्ही दाखवून दिले. काश्मीरमध्ये देखील आपला तिरंगा लहरवला आहे. जय हिंद! भारताचे अभिनंदन! अभिवादन!”