Heatwave In India: गेल्या 36 तासांत उष्माघाता (Heat Stroke) ने आणखी 45 जणांचा बळी गेला. उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 87 झाली आहे. पश्चिम ओडिशात उष्माघाताने आणखी 19 जणांचा मृत्यू झाला. तसेच उत्तर प्रदेशात एकाच दिवसात 16 जणांचा मृत्यू झाला, तर बिहारमध्ये पाच, राजस्थानमध्ये चार आणि पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला. ओडिशात, गुरुवार आणि शुक्रवारी 19 मृत्यू झाल्यामुळे गेल्या 48 तासांमध्ये मृतांची संख्या 29 वर पोहोचली आहे. अतिउच्च तापमानामुळे मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तथापी, 29 मृत्यूंपैकी 12 सुंदरगडमधील आणि नऊ जण झारसुगुडा येथील आहेत. संबलपूरमध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर बारगढमध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. विशेष मदत आयुक्त (एसआरसी) सत्यब्रत साहू यांनी सांगितले की, या सर्व मृत्यूंचा उष्माघात हे कारण आहे का हे तपासण्यासाठी तपास केला जात आहे. (हेही वाचा - Heatwave In India: देशात उष्णतेच्या लाटेने 42 जणांचा मृत्यू; दिल्लीत आज धुळीच्या वादळाची शक्यता)
झारसुगुडा येथे मृत्युमुखी पडलेल्या नऊपैकी सात ट्रक चालक होते. जे खनिज वाहतूक करताना औद्योगिक शहरातून जात होते. याशिवाय, यूपीमध्ये शुक्रवारी मृत्यू झालेल्या 16 लोकांपैकी 11 मतदान कर्मचारी होते. मतदान कर्मचाऱ्यांपैकी, मिर्झापूरमध्ये पाच होमगार्डसह आठ जणांचा मृत्यू झाला, तर सोनभद्रमध्ये दोन आणि रायबरेलीमध्ये एकाचा मृत्यू झाला.
मिर्झापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आरबी कमल म्हणाले, आम्ही शुक्रवारी उष्माघातामुळे आठ मतदान कर्मचाऱ्यांसह 13 मृत्यूची नोंद केली. सर्व पीडितांना उच्च ताप, उच्च रक्तदाब, मधुमेह यासह वैद्यकीय समस्या होत्या.