Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील बुंदेलखंड गौरव महोत्सवात स्फोट झाला. या भीषण स्फोटात चार मुलांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजनेय मिश्रा (11), प्रभात पटेल (10), पारस शर्मा (12) आणि मोहित कुमार (14) तिघेही चित्रकूट येथील रहिवाशी अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुंदेलखंड गौरव महोत्सवात स्फोट झाला आणि यात चार मुलांचा मृत्यू झाला. कार्यक्रमासाठी स्टेजच्या मागे ठेवलेल्या बॉम्बचा अनपेक्षितपणे स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांना पाचारण करण्यात आले. चित्रकूटचे डीआयजी, जिल्हा अधिकारी चित्रकूट आणि एसपी, अतिरिक्त एसपी यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी आले. सोबत फॉरेन्सिक टीम, बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड (बीडीएस) ची टीमही दाखल झाली आहे.
मुलांचे मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानथ यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.