CBSE Board Exams 2021 Datesheet Update: मोठी बातमी! 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार CBSE च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक
Representational Image (Photo Credits: All India Radio News/ Facebook)

अनेक राज्य मंडळे आपली दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी तारीखपत्रके जाहीर करीत असताना, सीबीएसई (CBSE) बोर्डाचे विद्यार्थी त्यांच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखेची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 2 फेब्रुवारी रोजी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी केली. यासह सीबीएसई विद्यार्थ्यांच्या 45 वर्षांच्या नोंदीचे डिजिटायझेशन करेल, असेही पोखरियाल यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in वर जाहीर केले जाईल.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी नुकतीच घोषणा केली होती की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची संलग्न शाळांमधील दहावी आणि बारावीच्या  विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे.15 जुलै 2021 रोजी निकाल जाहीर केला जाईल असेही पोखरियालने नमूद केले होते.

याआधी लॉ स्कूल अ‍ॅडमिशन कौन्सिलने (LSAC) 10 मेपासून लॉ स्कूल प्रवेश परीक्षा (LSAT) 2021 पुढे ढकलली आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमुळे परिषदेने LSAT 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता सीबीएसई बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉ अ‍ॅडमिशन टेस्टच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. आता ही परीक्षा 14 जूनपासून सुरू होईल. (हेही वाचा: 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल, 10 वी परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती)

दरम्यान, आजच्या थेट संवादात शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई शाळांच्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सुमारे एक हजार शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रमुखही यात सहभागी होते. या चर्चेचा मुख्य मुद्दा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भूमीगत स्तरावर कसा लागू करावा हे होते.