जयपूर: अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या काँग्रेस (Congress) सरकारने राजस्थान (Rajasthan) मध्ये सत्ता ताब्यात घेऊन सहा महिने न होताच शालेय पुस्तकांमध्ये एक मोठा बदल केला आहे. यापूर्वी पाठयपुस्तकांमधून वि. दा. सावरकर (V.D. Savarkar) यांना देण्यात आलेल्या 'वीर' पदवीला वगळून आता नवीन पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनायक सावरकर यांनी इंग्रज सरकारला दिलेल्या याचिकापत्रात स्वतःला पोर्तुगालचा पुत्र म्हंटल्याचा उलेख देखील धड्यांमध्ये करण्यात आला आहे. इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकातून नोटबंदीचे (Demonetisation) सर्व पाठ वगळण्यात आल्याचे सुद्धा समजत आहे.
जाणून घ्या काय आहे नेमका बदल
-जुन्या पाठयपुस्तकातील धड्यांमध्ये वीर सावरकर या शीर्षकाखाली सावरकरांची भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भूमिका मांडण्यात आली होती. मात्र आता नवीन बदलाप्रमाणे शीर्षकातील वीर हे विशेषण काढून त्याजागी केवळ विनायक दामोदर सावरकर असे ठेवण्यात आले आहे.
-या पुस्तकामध्ये सावरकर हे हिंदू नेते असून त्यांनी भारताला हिंदूंचे राष्ट्र म्हणून ओळख द्यायचे काम केले असे म्हंटले गेलेय तसेच इंग्रजांच्या कैदीत असताना त्यांनी तब्बल चार वेळा दयेची याचिका केली होती, 1942 मध्ये भारत छोडो चळवळीला तर स्वातंत्र्य वेळी पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध केला असे मांडण्यात आले आहे.
-महात्मा गांधी यांच्या हत्येशी सावरकरांचा संबंध मांडण्यात आला आहे.
-जुन्या पुस्तकात नोटबंदी म्हणजे काळ्या पैश्याची सफाई असा देण्यात आलेला संदर्भ देखील आता हटवण्यात आला आहे.
-जुन्या पुस्तकांमध्ये केवळ मुस्लिम संघटनांचा उल्लेख होता त्यात आता हिंदू महासभेचे नाव देखील जोडले आहे,
- नव्या पुस्तकातून जिहाद हा शब्द काढून टाकण्यात आला आहे.
- महाराणा प्रताप आणि अकबर यांच्या युद्धांविषयी माहितीत बदल केला आहे
राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंग दोतसारा यांच्या माहितीनुसार, पुस्तकात मांडलेल्या इतिहासाच्या घटनांमध्ये चुका असल्याचे सांगत सरकारने 13 फेब्रुवारीला तज्ज्ञांच्या एका समितीची स्थापना केली होती. या मागे कोणताही राजकीय हेतू नसून सध्या केलेले बदल हे समितीच्या अहवालाच्या आधारे करण्यात आल्याचे सांगितले जातेय. याशिवाय भाजपा सरकारने मात्र त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवा संघाची विचारधारा लादण्यासाठी मुद्दाम अभ्यासक्रमात बदल केले होते ज्यात चुकीची माहिती दिली गेली होती तसेच त्यामुळे सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे देखील गोविंद यांनी म्हंटले आहे.
राजस्थान मधील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाचा विरोध करून भाजपा आमदार वासुदेव देवनानी यांनी "क्रांतिकारीयों का अपमान यहीं काँग्रेस की पेहचान" अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सावरकर, सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास बाहेर आल्यास नेहरू आणि गांधी परिवाराच्या प्रतिमेला धक्का बसू नये म्हणून असे बदल केले जात आहेत असेही म्हंटले आहे.