महाराष्ट्रात Online Education जोमात; सरकारने सुरु केले 1 ली ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी 4 YouTube Channels व 3 री ते 12 वी साठी जिओ टी.व्ही वर 12 Channel
Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने आता यूट्यूबचा आधार घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) ने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार नवीन यू-ट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी एका ट्वीटद्वारे दिली आहे. चॅनेल्स मराठी व उर्दू भाषेत शिक्षण देतील आणि नंतर हिंदी आणि इंग्रजीमध्येही अशी चॅनेल्स सुरु करण्यात येणार आहेत. यावरून राज्यात ऑनलाईन शिक्षण (Online Education) जोमात सुरु असल्याचे दिसत आहे.

आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणतात, ‘इ.1 ली ते इ.10 वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने, 4 YouTube Channel सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत.’ यासह त्यांनी पुढे माहिती दिली आहे की, इ. 3 री ते इ.12 वी साठी आता जिओ टी.व्ही वर एकूण 12 चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने 4 माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.

पहा ट्वीट -

उल्लेखनीय आहे की महाराष्ट्र सरकारने सर्व वर्गांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे आदेश बुधवारी शाळांना दिले आहेत. प्री-प्राइमरीसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी 30 मिनिटे ऑनलाईन वर्ग घेतले जातील, ज्यामध्ये शिक्षक मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करतील. तिसरी ते आठवीसाठी दररोज 45 मिनिटे दोन वर्ग चालतील. नववी ते बारावी साठी प्रतिदिन 45 मिनिटांचे चार वर्ग चालतील.

(हेही वाचा: महाराष्ट्रातील इयत्ता 9 वी आणि 11 वी मधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तीर्ण होण्याची संधी; तोंडी परीक्षेच्या आधारे विद्यार्थी जाणार पुढील वर्गात)

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने 5 जुलै 2020 रोजी राज्यात रिलायन्स जिओ टीव्ही आणि जिओ सावनवर तीन वाहिन्या सुरू केल्या. या वाहिन्या दहावीच्या मराठी व इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता 12 वीच्या विज्ञान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आहेत. ज्ञानगंगा नावाचा कार्यक्रम 12 वीचा अभ्यासक्रम आणि १० वीचा मराठी व इंग्रजी अभ्यासक्रमांना समर्पित आहे.