दिलासादायक! आयटी कंपनी Infosys देणार तब्बल 35,000 फ्रेशर्सना नोकऱ्या; Q1 मध्ये झाला 5195 कोटींचा नफा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) बुधवारी चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीला 5195 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो अंदाजापेक्षा थोडा कमी आहे. यापूर्वी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 5,076 कोटी रुपये होता. याव्यतिरिक्त कोरोना काळामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, आयटी कंपनी इन्फोसिसने वित्त वर्ष 2021-22 मध्ये 35,000 फ्रेशर्स पदवीधारकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे.

तिमाही-दर-तिमाही आधारावर इन्फोसिसचा नफा 2.3 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 22.7 टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी याच काळात (एप्रिल ते जून तिमाही) कंपनीचा नफा 4,233 कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्न 23,665 कोटी रुपयांवरून 27,896 कोटी रुपयांवर गेले आहे. त्याचबरोबर, इन्फोसिसमधील कर्मचार्‍यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण जूनच्या तिमाहीत 13.9 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आधीच्या तिमाहीत (मार्च तिमाहीत) ते 10.9 टक्के होते. मात्र, गेल्या वर्षीच्या जूनच्या तिमाहीत हा दर 15.6 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

त्रैमासिक निकाल जाहीर करताना इन्फोसिसने सांगितले की ते, आर्थिक वर्ष 2022 दरम्यान 35,000 नवीन लोकांची भरती करतील. यात कंपनी फ्रेशर्सना संधी देईल. त्याचबरोबर, कंपनी आपली वेतनवाढ ही जुलैपासून लागू करेल. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव म्हणतात की, डिजिटल टॅलेंटची मागणी वाढली आहे म्हणूनच जागतिक स्तरावर, कंपनी 2021-22 मध्ये सुमारे 35,000 महाविद्यालयीन पदवीधरांना नियुक्त करेल. (हेही वाचा: BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12 वी ऊतीर्ण करू शकतात अर्ज)

कंपनीचा डिजिटल महसूल एकूण महसुलाच्या 53.9 टक्के होता. वर्षाच्या आधारावर स्थिर चलनाची वाढ 42.1% नोंदविली गेली. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमामध्ये 33% वाढ झाली आहे, तर किरकोळ सेवांमध्ये 15% वाढ नोंदवली गेली आहे. भौगोलिक यादीनुसार उत्तर अमेरिका 61.7%, युरोपमध्ये 24% आणि भारतामध्ये 2.9 टक्के वाढ झाली आहे.