आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना पालकांनी कोणत्या '5' गोष्टींना दिले पाहिजे प्राधान्य, सांगतायत Education Counsellor प्रियांका मसुरकर
School (Photo Credits: File Photo)

School Tips: प्रत्येक जबाबदार पालकांना प्रश्न सतावत असतो तो आपल्या मुलांच्या शिक्षणाचा, त्याचा भविष्याचा. मुलं जन्माला आले की प्रत्येक पालकांचा त्यांच्या पाल्यासाठी भविष्यात काय तरतूद करावी या दिशेने प्रवास सुरु होतो. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही किंवा ज्या मिळाल्या त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना आपल्याला देता आल्या पाहिजे. त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे जेव्हा त्यांची मुले शिक्षणाचा श्रीगणेशा करतात म्हणजेच त्याची पहिली सुरुवात करतात तेव्हा त्याला कोणत्या शाळेत (School) घालावे हा गहन प्रश्न सर्वच पालकांना सतावत असतो.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात शिक्षणात होणारे नवनवीन बदलांनी पालक अगदी भांबावून जातात. अशा वेळी त्यांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. म्हणूनच त्यांच्या या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी लेटेस्टली मराठीने बातचीत केली  शिक्षण समुपदेशक प्रियांका मसुरकर (Education Counsellor Priyanka Masurkar) यांच्याशी आणि जाणून घेतल्या त्या '5' महत्त्वाच्या गोष्टी जे शाळा निवडताना खूपच फायदेशीर ठरू शकतात.

1. तुमचे Social Network वाढवा:

कुठलीही शाळा निवडताना पालक त्या शाळेत जाऊन किंवा शाळेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन त्या शाळेविषयी माहिती काढतात. अशा वेळी सर्वसाधारण त्या शाळेविषयी चांगलीच माहिती दिलेली असते. म्हणून तुमच्या पद्धतीने शाळेच्या इतर नियम आणि अटींचा अभ्यास करा आणि या शाळेत शिकणा-या आपल्याजवळील अन्य विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून त्या शाळेविषयी, तेथील शिकवण्याची पद्धत, वातावरण, शिक्षक यांच्याविषयी माहिती काढा.

हेदेखील वाचा- Tips For Parents: अतिजड शालेय दप्तर तुमच्या लहाग्याच्या आरोग्यावर पडू शकते भारी, पालकांनो अशी घ्या काळजी

2. शाळेच्या नावांवर हुरळून जाऊ नका किंवा शाळेबाबतीत इतरांशी स्पर्धा लावू नका:

शाळा निवडताना तुमचा मुख्य उद्देश हा तुमचा पाल्य असला पाहिजे. केवळ महागडी शाळा आहे त्यामुळे ती चांगलीच असणार असा अतिविश्वास बाळगू नका. त्या शाळेविषयी व्यवस्थित माहिती काढा. तसेच आपल्या शेजारचा किंवा मित्र-मैत्रिणींचा मुलगा/मुलगी ज्या शाळेत आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या शाळेत आपल्या पाल्याला टाकायचे ही स्पर्धा बंद करा; उलट याने तुमच्या मुलांचे नुकसान होईल.

3. पाल्याच्या क्षमतेनुसार शाळा निवडा:

सध्याच्या स्पर्धात्मक युगात शाळांसोबत त्यांच्या बोर्डांच्या ही स्पर्धा सुरु झाल्या आहेत. यात सध्या SSC, CBSE आणि ICSE हे तीन बोर्ड आहेत. यात इतर मुलांशी तुलना करुन आपल्या मुलाला एखाद्या बोर्डमध्ये टाकण्यापेक्षा त्याच्या बुद्धिक्षमतेला, त्याच्या कलागुणांना कोणत्या शाळेत जास्त वाव मिळेल ते विचारात घ्या.

4. पाल्याप्रमाणे तुम्हालाही सर्व बाबतीत सोयीचे पडेल अशी शाळा निवडा:

याचा अर्थ असा की मुलाचे आई-वडिल दोघेही नोकरी करत असत असतील किंवा भविष्यात त्यांची देश विदेशात अशी फिरती नोकरी असेल तर शक्यतो ICSE बोर्डला प्राधान्य द्या. कारण SSC बोर्ड हा केवळ महाराष्ट्रापुरताच आहे. तसेच प्रत्येक बोर्डाचा अभ्यासक्रमाची पद्धत ही वेगवेगळी असते. अशावेळी तुम्हाला तुमची नोकरी सांभाळून त्यांचा अभ्यास, प्रोजेक्ट घेता येतील का याचा विचार करा.

5. फी तक्ता आणि तुमचे बजेट याची नीट सांगड घाला:

कधीकधी मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या उद्देशापायी आपण मुलांना महागडया शाळेत पाठवतो. मात्र जेव्हा फी वाढत जाते तेव्हा आपले महिना बजेट आणि फी ची सांगड घालणे अवघड होऊन बसते. अशा वेळी आधी पालकांनी एकत्र बसून यावर नीट चर्चा करा. तुमचा पगार, घरातील खर्च, इतर आणि मुलाची फी याचा नीट हिशोब घाला. कारण जर उद्या तुम्हाला फी भरणे जमले नाही आणि तुम्ही तुमच्या मुलाला मोठ्या शाळेतून अन्य शाळेत घातले तर त्याच्या मनावर विपरित परिणाम होतो.

ज्ञान ही शक्ती तर साक्षरता ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्न पाहतात हे काही चुकीचे नाही. मात्र हे सर्व करताना आपल्या पाल्याची क्षमता, तुमची क्षमता या सर्वांचा विचार करुनच आपल्या मुलासाठी योग्य ती शाळा निवडावी असे प्रियांका मसुरकर यांनी सांगितले आहे.