कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लॉक डाऊन सुरु झाले व त्यानंतर देशातील अनेक गोष्टी बंद ठेवण्यात आल्या. यामध्ये सुमारे चार महिने कोचिंग क्लासेस (Coaching Classes) देखील बंद आहेत. आता महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसना ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये पुन्हा त्यांचे कामकाज सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी क्लासेसच्या मालकांकडून जोर धरू लागली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील या कोचिंग क्लासेसच्या मालकांनी यावर्षीची कर सवलत आणि या वर्षासाठी अभ्यासक्रम व परीक्षा रचने बाबतच्या स्पष्टतेसाठी सरकारकडे विनंती केली आहे. सध्या राज्यामध्ये अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्या देत आहेत.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन (MCOA), असोसिएशन ऑफ कोचिंग इंस्टिट्यूट नागपूर (ACI), कोचिंग क्लासेस प्रोप्रायटर असोसिएशन महाराष्ट्र राज्य (CCPA) आणि असोसिएशन ऑफ कोचिंग क्लास ओनर्स अँड मेंटर्स (ACCOM) चे राज्यभरातील सुमारे 98,000 कोचिंग क्लास मालक म्हणाले की, यावर्षी विद्यार्थ्यांची नोंदणी 30 टक्क्यांपर्यंत घसरली आहे आणि त्यापैकी बर्याच ठिकाणी नोंदणी टिकवून ठेवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत आहेत.
याबाबत बोलताना असोसिएशनचे सचिव प्रजेश ट्रॉटस्की म्हणाले, 'आम्ही हे सुनिश्चित करीत आहोत की, सध्याच्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही आणि म्हणूनच आमच्यापैकी बहुतेकांनी शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 50-60 टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. परंतु, अभ्यासक्रम कमी करण्या बाबत आणि परीक्षा कशा घेतल्या जातील याबाबत सरकारने कोणतीही ठोस गोष्ट जाहीर केलेली नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रलंबित असलेल्या परीक्षांबाबतही अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.' (हेही वाचा: कोरोना व्हायरस संकटकाळात TCS कंपनीचा मोठा निर्णय; देणार तब्बल 40 हजार फ्रेशर्सना नोकरी)
त्यानंतर कर्नावत यांनी आपल्या काही मागण्या मांडल्या, त्यामध्ये ते म्हणतात- 'आमची विनंती आहे की आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कोणत्याही जीएसटीवर शुल्क आकारू नये. आम्ही शैक्षणिक सेवा देत असल्याने जीएसटी देखील कमी असणे आवश्यक आहे. जर सरकारने जीएसटी कमी केला तर आम्ही फीदेखील कमी करू आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू. तसेच आम्हाला लॉकडाऊन मधील प्रत्येक महिन्यासाठी प्रत्येक कोचिंग क्लास मालकाला 25,000 रुपयांचे आर्थिक पॅकेज देखील हवे आहे.'