File image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीने भारतामध्ये पाऊल टाकल्याबरोबर, खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने देशव्यापी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले होते. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास काही प्रमाणत आळा बसला असला तरी, या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे उद्योग व व्यवसाय बंद पडले. सध्या आर्थिक तंगी चालू असताना टेक कंपनी टीसीएस (TSC) कडून एक सकारात्मक बातमी येत आहे. टीसीएसने देशभरातील कॅम्पसमधील 40 हजार फ्रेशर्सना नोकर्‍या (Freshers Placement) देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही कंपनीने जवळपास एवढेच फ्रेशर्स नियुक्त केले होते.

यावर्षी, टीसीएसची ही भरती या अर्थाने महत्त्वपूर्ण असणार आहे  कारण, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या सर्व कंपन्यांचे काम जवळजवळ ठप्प आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या कामगारांना काढून टाकत आहेत. परंतु टीसीएसने आपली भरती तशीच ठेवण्याचे ठरवले आहे. यासह टीसीएसने आपल्या अमेरिकेतील कॅम्पस प्लेसमेंट्स दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, काही निम्न स्तरावरील भरती कंपनी निवडकपणे सुरू करू शकते. (हेही वाचा: राज्यात 10 हजार पोलिसांची भरती, वर्षभरात होणार प्रक्रिया पूर्ण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा)

कोरोनामुळे टीसीएसचा महसूल जूनच्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात घसरला होता. परंतु असे असूनही, कंपनीने यावेळी देखील कॅम्पसमधून 40 हजारांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्हीएसचे ईव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लकड म्हणाले की, 'पाया पासून सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही 40 हजार भरती करू. ही संख्या 35 हजार किंवा 45 हजार देखील होऊ शकते, हा एक टेक्टिकल कॉल असेल.' चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाईमध्ये हा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल अशी कंपनीची अपेक्षा आहे.