Government Jobs in Maharashtra: राज्यात 10 हजार पोलिसांची भरती, वर्षभरात होणार प्रक्रिया पूर्ण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा   
Maharashtra Police | (File Photo)

Maharashtra Police Recruitment: कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या या काळात राज्यातील पोलीस  (Police) फ्रंटलाईन वर लढत आहेत. गेले काही महिने या पोलिसांवर प्रचंड ताण आहे. म्हणूनच आता राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच, पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत घोषणा केली. याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, असे अजित पवार म्हणाले. यासोबतच नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालत पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 3,520 बेड्सच्या कोरोना उपचार सुविधांचे लोकार्पण)

यावेळी अजित पवार यांनी 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. दुसरीकडे नागपूर येथील काटोलच्या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.